मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे बारसूला जाणार

मुंबई-बारसू रिफायनरीवरून राजकीय वातावरण तापले असून, रोज आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मुख्यमंत्री असताना बारसू प्रकल्पासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिणाऱ्या उद्धव ठाकरेंवर सत्ताधारी नेत्यांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. मात्र, शिवसेनेने पूर्ण ताकदीने बारसू विरोधातील आंदोलकांच्या मागे उभे राहण्याचे ठरवले आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मेच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे हे बारसूला जाणार आहेत. तिथे जाऊन ते परिसरातील पाच गावांत जाऊन ग्रामस्थांना भेटणार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत त्यांनी असेही सांगितले की, बारसू परिसरातील पाचही गावांतील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन रिफायनरीच्या विरोधात ठराव मंजूर केला आहे. तो तीन-तीन वेळा केंद्र सरकारला पाठवला आहे. परंतु हा केंद्र सरकारचा प्रकल्प असल्याने ग्रामसभा, जनसुनावणी, सहमती यांचा प्रश्नच येत नाही, असे सरकारचे म्हणणे आहे.
दरम्यान, भारतीय कामगार सेनेच्या 55 व्या सर्वसाधारण सभेत उद्धव ठाकरे यांनी बारसूबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, बारसूसाठी मी मुख्यमंत्री असताना पत्र दिले, असे सांगितले जातेय. पण मी कुठे नाही म्हणतोय. मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे तेथील स्थानिकांवर तुमच्यासारखी अशी जोरजबरदस्ती केली नव्हती.
पर्यावरणाला हानी करणारा प्रकल्प आम्हाला नको. आमची अशी भूमिका आहे की, जिथे स्वागत होईल, तिथे प्रकल्प करा. मी मुख्यमंत्री झाल्यावर दिल्लीवरून वारंवार असे सांगण्यात आले की, हा मोठा शुद्धीकरण प्रकल्प आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार मिळेल. म्हणून प्राथमिक अहवाल मागितला. नंतर आमचे सरकार गेले. त्यांचे सरकार आल्यावर दरम्यानच्या काळात वरून ओके आले असावे. आता पोलीस घरात घुसवले जात आहेत, टाळकी फोडली जात आहेत. प्रकल्प लोकांच्या हिताचा असेल, तर जबरदस्ती का? असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
जमीन आमची, इमले तुमचे हे कसे चालेल? असा सवाल करत मूळ मालकांकडून जमिनी दलालांच्या ताब्यात गेल्या आहेत. त्यामुळे दलालांच्या होकाराला नागरिकांचा होकार समजू नका. लोकांचा आवाज सरकारला ऐकावाच लागेल. बारसूत प्रकल्प नको. ही स्थानिकांची भूमिका आहे, तीच शिवसेनेची भूमिका आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी संघटनेच्या मुख्य सल्लागारपदी उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली तर अध्यक्ष म्हणून खासदार अरविंद सावंत यांची निवड करण्यात आली.
रिफायनरीला पाठींबा दिल्याने
राजन साळवींच्या सुरक्षेत वाढ

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी रिफायनरीला समर्थन दिल्याचे ट्विट केल्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान रिफायनरीच्या काही प्रमुख मुद्यांवर प्रशासन आंदोलकांसह तज्ज्ञांची राजापुरात आणखी एक बैठक होणार असल्याने या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या माती परीक्षणाच्या कामाला सुरूवात झाली. मात्र, या प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला येणार हे कळताच ग्रामस्थांनी आंदोलन छेडले आहे. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांसह ठाकरे गटानेही बारसूतील सर्वेक्षण त्वरित थांबवण्याची मागणी करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी मात्र बारसू रिफायनरी प्रकल्पाला ट्विट करुन त्यांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन करणारे गावकरी चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे आता राजन साळवी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
बारसू ग्रामस्थ ‘मातोश्री’वर
उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा

बारसू रिफायनरीच्या सर्व्हेविरोधात ग्रामस्थांचे चौथ्या दिवशीही आंदोलन सुरू होते. बारसूमध्ये रिफायनरीचे माती परिक्षण युद्धपातळीवर सुरु असताना आज दुपारी काही बारसूतील काही ग्रामस्थ ‘मातोश्री’ बंगल्यावर पोहोचले आणि त्यांनी रिफायनरीच्या प्रश्नांवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
ग्रामस्थांच्या आंदोलनावरुन शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या आंदोलनादरम्यान, रिफायनरी विरोधी संघटनेचे नरेंद्र जोशींनी एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. जोपर्यंत संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यावर असलेले तडीपारीची नोटीस जोपर्यंत रद्द होत नाही. तोपर्यंत आम्ही चर्चेला बसणार नाही. कारण प्रशासन नेमकी चर्चा कुणाशी करणार हे देखील प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी नरेंद्र जोशींनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top