बँकॉक –
मोचा चक्रीवादळामुळे म्यानमारमध्ये १४५ लोकांचा मृत्यू झाला असून, १ लाख ८५ हजारांहून अधिक इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तथापि, जीवित व वित्तहानीचे एकत्रित चित्र अद्यापही स्पष्ट नाही.
मोचा चक्रीवादळाने सगळ्यात मोठा म्यानमारमध्ये विध्वंस घडवला. जाहीर झालेला मृतांचा आकडा हा केवळ राखीन राज्यातील आहे. या राज्याला चक्रीवादळ मोचाचा सर्वाधिक फटका बसला. देशाच्या इतर भागांनाही मोचाची झळ बसली आहे. तिथल्या हानीची सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही. राखीन राज्यात घरे आणि पायाभूत सुविधांची प्रचंड हानी झाली आहे. गेल्या रविवारी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोचा चक्रीवादळाने बांगलादेश व म्यानमारच्या राखीन राज्यात जोरदार वारे वाहण्यासह मुसळधार पाऊस झाला होता. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. त्यानुसार खबरदारीच्या उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या. तरीही वादळाने मोठी वित्त आणि प्राणहानी घडवली.