मोचा चक्रीवादळ बांगलादेशात धडकल्याने सीमा भागात पाऊस

ढाका – मोचा चक्रीवादळ अखेर आज ताशी २०० किमी वेगाने बांगलादेश-म्यानमारच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले . त्यामुळे आज बांगलादेश म्यानमारच्या सीमा भागात मुसळधार पाऊस झाला. नागरिकांनी किनारपट्टीजवळ जाऊ नये, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. याशिवाय समुद्रकिनारपट्टी जवळील रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले.

या चक्रीवादळाचा बांगलादेशच्या दक्षिण-पूर्व भागातील जिल्ह्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कॉक्स बाजार परिसरातून एक लाख ९० हजार लोकांना, तर चितगावमधून एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या भागात मोठ्या प्रमाणात रोहिंग्या नागरिक राहत असल्याची माहिती स्थानिक विभागीय आयुक्त अमिनुर रहमान यांनी दिली. बांग्लादेशप्रमाणे म्यानमारमधील राखीन भागातील १० हजार नागरिकांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे सुरु असलेल्या विश्व खाद्य कार्यक्रमांतर्गत येथील नागरिकांना अन्न आणि इतर मदत दिली जात आहे. दरम्यान, या चक्रीवादळाचा परिणाम ईशान्य-पूर्व भारतातील काही भागांवरही होण्याची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर आणि दक्षिण आसाममधील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. या चक्रवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या आठ टीम पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. तर, एनडीआरएफचे २०० जवान कार्यरत असून १०० जवान राखीव ठेवण्यात आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top