मोटारीची दुचाकीला धडक! दोन मित्रांचा जागीच मृत्यू

शिरूर- पुणे – नगर रस्त्यावर न्हावरे फाट्याजवळ (ता. शिरूर) काल रात्री भीषण अपघात घडला. मोटारचालकाने दुचाकीला मागून धडक दिल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटनेरवर दुचाकी आदळली. या अपघातात शिरूर मधील दोघेजण दोन वाहनांच्यामध्ये चिरडून जागीच ठार झाले. ही घटना रात्री १०:३० च्या सुमारास घडली.
नीलेश हैबती थिटे (२९) आणि शिवाजी अरूण जवळगे (२९) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे होती. हे दोघेही प्रीतम प्रकाश नगर, शिरूर येथील रहिवासी होते. नीलेश व शिवाजी हे एकमेकांचे जिवलग मित्र होते. ते कुरिअर व इतर कामे करत असत. शिवाजी याचे कुरिअरचे काम असल्याने काल सायंकाळी हे दोघे कारेगाव येथे गेले होते. तेथील काम आटोपून ते दुचाकीवरून शिरूरला घरी जात होते. यावेळी न्हावरे फाट्याजवळील हॉटेल शिवनेरी समोर नगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव मोटारीने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या जोरदार धडकेमुळे त्यांचा गाडीवरील ताबा सुटून ते दोघे रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या गॅस वाहतूकीच्या कंटेनरवर आदळले. त्यात दोघांनाही गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top