मोदींचा वाढदिवस नव्या संसदेवर तिरंगा

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस येत्या रविवारी 17 सप्टेंबरला साजरा होत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी येणारा हा वाढदिवसही गाजवण्याचा भाजपचा निर्धार आहे. या दिवसाचे निमित्त साधत थेट संसदेच्या नव्या इमारतीवर तिरंगा फडकवण्याचा सोहळा करण्यात येणार आहे. वाढदिवसाचे अन्य भरगच्च कार्यक्रमही पक्षाने आखले आहेत.

संसदेचे विशेष अधिवेशन 18 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिल्या दिवसाचे कामकाज जुन्या संसदेत होणार आहे. यानंतर 19 तारखेला हे अधिवेशन नव्या इमारतीत स्थलांतरित करण्यात येईल. मात्र त्याआधी, 17 सप्टेंबर रोजी नव्या संसद इमारतीवर तिरंगा फडकवला जाईल.
केंद्रीय लोक निर्माण विभागाने नवी इमारत बांधली आहे. नव्या संसदेत तीन प्रवेशद्वार आहेत. या तीन प्रवेशद्वारापैकी एक मुख्य प्रवेशद्वार असणार्‍या गजद्वारासमोर ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. उद्घाटनानंतर पार पडणारा हा पहिलाच सोहळा आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा मुंबईत नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन भाजपने सुरू केले आहे.
मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप सक्रीय होणार आहे. मुंबईत जनसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी 15 दिवस कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. रक्तदान शिबीर, आयुष्यमान भारत कार्डचे वाटप, स्वच्छता मोहीमांचा धडाका
असणार आहे.
तसेच खासदारांपासून आमदार, नगरसेवक, जिल्हा अध्यक्ष, मंडल अध्यक्षांना कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकाधिक सर्वसामान्य नागरिकांना कार्यक्रमात सामील करून घेण्याचे आदेश आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत कार्यक्रम सुरू राहणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top