नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा उंचावण्यासाठी सरकारी तिजोरीतून 2300 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप काँग्रेसने ट्विटरवरुन केला. नरेंद्र मोदी 18 तास काम करत असतील तर त्यांच्या जाहिरातींवर इतके पैसे खर्च करण्याची गरज काय, असा सवाल काँग्रेसने केला आहे.
या व्हिडीओत मोदी म्हणत आहेत की,‘सत्तेत आलेला राजकीय पक्ष करदात्यांच्या पैशांचा वापर आपल्या पक्षाच्या हितासाठी करत आहे की देशाच्या हितासाठी करत आहे हे जनतेला पाहावे लागणार आहे.त्यानंतर व्हिडीओत अन्य एका ठिकाणी अमित शाह म्हणत आहेत की,‘पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 तासांपैकी 18 तास काम करतात.
काँग्रेसने या व्हिडीओत म्हटले की,‘मोदी बोलतात एक आणि वागतात वेगळेच. मोदींनी स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी देशवासियांचा पैसा पाण्यासारखा खर्च केला. सत्तेत आल्यानंतर केवळ 7 वर्षांत मोदी सरकारने मोदींसाठी लोकांच्या मेहनतीच्या कमाईतील 2300 कोटी रुपये स्वतःच्या जाहिरातींवर खर्च केले. म्हणजे मोदी सरकारने दररोज 90 लाख, दर तासाला 3 लाख 75 हजार रुपये केवळ नरेंद्र मोदींचा चेहरा चमकावण्यासाठी खर्च केले. हा आकडा केवळ छापील वर्तमानपत्रांचा आहे. उर्वरित माध्यमांमधील खर्च यापेक्षा कितीतरी अधिक आहे,`असाही दावा काँग्रेसने केला.