अहमदाबाद – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दिलासा देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिला. मोदी आडनाव बदनामी प्रकरणी दोषी ठरवण्याला स्थगिती मिळावी यासाठी राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील निकाल न्यायालयाने आज राखून ठेवला. यावर न्यायमूर्ती हेमंत प्रचारक सुट्टीनंतर निकाल देणार आहेत. तोपर्यंत राहुल गांधींना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. उन्हाळी सुट्या संपल्यानंतर जून महिन्यात निकाल देऊ, असे गुजरात उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले.
ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी हे राहुल गांधींच्या वतीने युक्तिवाद करताना आज म्हणाले की, “मी हे पहिलेच प्रकरण पाहिले आहे, ज्यात मानहानीसाठी जास्तीत जास्त शिक्षा ठोठावण्यात आली आहे,” यापूर्वी २९ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी अनेक निर्णयांचा हवाला देत राहुल गांधींच्या वतीने युक्तिवाद केला. त्यात त्यांनी हा गंभीर गुन्हा नसल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. अशा स्थितीत शिक्षेला स्थगिती द्यावी, अन्यथा आमच्या अशिलाची (राहुल गांधी) राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल, असेही सिंघवी म्हणाले होते.