मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात एकाच वेळी अनेक क्रांतीकारी उपक्रमांची सुरुवात केली आहे. त्यांनी ४७.८ कोटी लोकांचे जनधन बँक खाती सुरु करून एक अभेद्य जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील विश्वधर्म संमेलनातील भाषणातून जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता; त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, या दुसऱ्या नरेंद्र यांनी, जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून आज आपण भारतीय आहोत याचा प्रत्येकाला अभिमान वाटतो, असे उद्गार महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओवरील ‘मन की बात’ या जनसंवादाच्या शंभराव्या भागाच्या सामुहिक प्रदर्शनानंतर राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बैस बोलत होते.
यावेळी हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, मधुमेह विशेषज्ञ व कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, ‘डिक्की’चे संस्थापक मिलिंद कांबळे, भरडधान्य उद्योजिका व प्रचारक शर्मिला ओस्वाल, राज्यातील अनेक पद्म पुरस्कार विजेते, ‘मन की बात’ कार्यक्रमांमध्ये पंतप्रधानांनी उल्लेख केलेले राज्यभरातील युवक, विद्यार्थी व नागरिक हे विशेष निमंत्रित म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी चित्रपट सृष्टीतील माधुरी दीक्षित, शाहीद कपूर, एकता कपूर, रोहित शेट्टी, सोनू निगम, प्रसाद ओक, शैलेश लोढा, अनुराधा पौडवाल आदी उपस्थित होते. ‘मन की बात चे दिनांक ३ ऑक्टोबर २०१४ रोजी पहिल्यांदा रेडिओवरून प्रसारण झाल्यापासून पंतप्रधान मोदी यांनी सदर कार्यक्रमातून जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली, असे सांगताना देशाला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान लाभले हे देशाचे सौभाग्य आहे असे राज्यपालांनी सांगितले.
मोदी यांनी जगाचा दृष्टिकोन बदलला राज्यपाल बैस यांच्याकडून कौतुक
