मोपा विमानतळावर मद्य दुकानांनास्थानिक मद्यविक्रेत्यांचा विरोध

पणजी –

गोव्यातील मोपा विमानतळावर किरकोळ दारू दुकाने सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात स्थानिक मद्यविक्रेत्यांच्या असोसिएशनने विरोध केला आहे. परवाना देण्याच्या कायद्यात बदल करून मुंबईच्या एका व्यावसायिकाला दुकान सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असा असोसिएशनचा आरोप आहे.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी अबकारी आयुक्त नारायण गाड यांची भेट घेतली. मोपा व दाबोळी विमानतळांवर मद्यदुकानांना परवाना देण्यासंदर्भात विचार सुरू आहे का, असे विचारले असता त्यांनी याबाबत काहीच माहिती उपलब्ध नसल्याचे संगितले. त्यावेळी विमानतळांवर मद्यिवक्रीची परवानगी दिल्यास राज्यातील घाऊक तसेच किरकोळ मद्यविक्रेत्यांवर मोठा परिणाम होणार असल्‍याने परवानगी दिली जाऊ नये अशी मागणी केली.

संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक म्हणाले की, गोव्यात काही भागात मद्यविक्रीला बंदी आहे. परंतु आता लवकरत तशी परवानगी देणारी अधिसूचना येणार आहे, असे कळते. मुख्यमंत्र्यांना तशी परवानगी द्यायची असल्यास ते देऊ शकतात. परंतु याचा फटका स्थानिक मद्यविक्रेत्यांना बसेल, जे बहुतांशी ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजातील आहेत.

गोवा हे पर्यटन राज्य असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. राज्यातील मद्यव्यवसाय हा पूर्णपणे पर्यटकांवर अवलंबून आहे. राज्यात सीलबंद मद्य बाटल्यांची विक्री करणारे सुमारे ३०७६ विक्रेते आणि दुकाने आहेत. रेस्टॉरंट्‌स व हॉटेल्समध्ये मद्यविक्री करणारे सुमारे ७९९८ परवानाधारक आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top