रबात – अरब राष्ट्रांपैकी सर्वांत दूरचे अरब राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणार्या मोरोक्कोमध्ये शक्तिशाली भूकंप झाला.या भूकंपामुळे आतापर्यंत २९६ जणांना मृत्यू झाला असून शेकडोजण जखमी झाले आहेत.या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.८ इतकी होती.स्थानिक वेळेनुसार रात्री ११.११ वाजण्याच्या सुमारास हा भूकंप झाला.
ऐतिहासिक मराकेश शहरापासून अॅटलास पर्वतापर्यंतच्या भागात अनेक इमारती या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे कोसळल्या आहेत.या भूकंपाचा केंद्रबिंदू मराकेश शहरापासून ७१ किमी अंतरावर दक्षिण- पश्चिमेस १८.५ किमी खोलीवर होता. या भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, मराकेशपासून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजधानी रबातमध्येही त्याचा प्रभाव जाणवला.युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आफ्रिकेत झालेल्या गेल्या १२० वर्षांतील हा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे.या भूकंपाशी संबंधित अंगावर शहारे आणणारे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शेअर केले जात आहेत.या भूकंपामुळे वीजपुरवठा खंडित होऊन मोबाईल, दूरध्वनी सेवा बंद पडली आहे. मराकेशला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भूकंपात प्राण गमावलेल्या कुटुंबीयांप्रति दुःख व्यक्त केले आहे.