नवी दिल्ली – राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड राज्यांत अधूनमधून मध्यम पाऊस सुरूच असून वायव्य भारतातून मोसमी पावसाच्या परतीसाठी अद्यापही पोषक वातावरण तयार झालेले नाही. वायव्य भारतात पावसाने उघडीप दिल्यानंतर मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी २० सप्टेंबरला राजस्थानातून मान्सून परतला होता. यंदा सुधारित वेळापत्रकानुसार १७ सप्टेंबर ही राजस्थानातून मान्सून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख हवामान विभागाने निश्चित केली होती. मात्र सध्या राजस्थानसह वायव्य भारतातील राज्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. या भागात पावसाची पोषक स्थिती कायम असल्याने मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होण्यास आणखी उशीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून मोसमीच्या परतीची वाटचाल १४ ऑक्टोबरला सुरू होईल. २३ ऑक्टोबर रोजी मोसमी पाऊस संपूर्ण देशातून परतणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते.
यंदा परतीचा पाऊस लांबणीवर?
