मॉस्को – रशियाच्या लष्करात सुरक्षासेवक या पदावर काम करीत असलेल्या एका भारतीय जवानाचा रशिया-युक्रेन सीमेलगत युक्रेनने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्यू झाला.
हेमील मंगुकुया असे या तरुणाचे नाव आहे. तो २३ वर्षांचा होता. २१ फेब्रुवारी रोजी युक्रेनने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात तो मारला गेला. ऐन तारुण्यात त्याचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेमील हा मुळचा गुजरातचा आहे. त्याचा मृतदेह भारतात आणण्यासाठी मदतीची याचना हेमीलच्या कुटुंबियांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र सरकारी अधिकाऱ्यांनी हेमीलचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही,असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला,असा आरोप हेमीलच्या काकांनी केला आहे.
तहेमीलला सध्याच्या युध्दग्रस्त स्थितीमध्ये रशिया सोडून भारतात परतायची इच्छा होती. त्यांनी तशी विनंती रशियन लष्करातील वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच आपल्या मुलाचा बळी गेला, असा आरोप हेमीलचे वडील अश्विन मंगुकुया यांनी केला आहे.
रशियाच्या लष्करामध्ये भरती होताना हेमीलकडून रशियन भाषेत लिहिलेल्या करारावर स्वाक्षरी करून घेण्यात आली होती, असा आरोपही अश्विन यांनी केला आहे.
हेमीलसोबत रशियन लष्करामध्ये भरती झालेल्या अन्य एका भारतीय सहकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, हेमील आपल्या डोळ्यादेखत मारला गेला. रशियन लष्करी अधिकारी आपल्याला सीमेवर गोळ्या झेलून मरण्यासाठी पाठवतील अशी आपल्याला भीती वाटत होती. ती हेमीलच्या मृत्यूमुळे खरी ठरली आहे.
या सहकाऱ्याने हेमीलचा मृतदेहाचे एक छायाचित्रही सोशल मीडियावर शेअर केला असून त्यामध्ये हेमील रक्तबंबाळ अवस्थेत मरण पावल्याचे दिसत आहे.