युरोपमध्ये उष्णतेची लाट! अनेक देशांना झळ

रोम – युरोपमध्ये सध्या प्रचंड उष्णतेची लाट सुरू असून सर्वाधिक तापमानामुळे लोकांच्या तब्येतीवर त्याचे गंभीर परिणाम जाणवू लागले असल्याने चिंता वाढली आहे. स्पेन, फ्रान्स, क्रोएशिया आणि इटलीच्या काही भागांत तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर गेला आहे. युरोपियन अंतराळ संस्थेच्या म्हणण्यानुसार संपूर्ण युरोपमध्ये तापमानात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
इटलीतील १६ शहरांना उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. खास करून रोम, फ्लोरेन्स, बोगोना या पर्यटनस्थळांना येत्या काही दिवसांत उष्णतेची मोठी झळ बसणार असून तंदुरुस्त माणसांनाही आरोग्याच्या समस्या उदभवू शकतात. इटलीच्या सरकारने लोकांना इशारा दिला आहे की, त्यांनी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळेत सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात येणे टाळावे.
इटालियन हवामान खात्याने सध्याच्या उष्णतेच्या लाटेला ‘सर्बेरस’ असे नाव दिलेले आहे. सर्बेरस हे तीन डोक्यांच्या राक्षसाचे नाव आहे.
शुक्रवारी ग्रीसमधील तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सिअसवर पोहोचल्याने अक्रोपोलिस हे प्रसिद्ध ऐतिहासिक पर्यटनस्थळ कडक उन्हाच्या वेळेत बंद ठेवावे लागले.
उष्णतेचा तडाखा दक्षिण युरोपबरोबर सेंट्रल युरोपलाही बसत असून जर्मनी, पोलंड या देशांनाही फटका बसत आहे. झेक रिपब्लिकच्या हवामान खात्यानेही आठवड्याअखेरीस तापमान ३८ डिग्री सेल्सिअसवर जाण्याचा इशारा दिला आहे. हे तापमान सरासरीपेक्षा खूप जास्त आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top