रंग लावण्याच्या निमित्तान परदेशी तरुणीसोबत गैरवर्तन

नवी दिल्ली:- होळी खेळण्याच्या नावाखाली एका जपानी तरूणीशी अश्लील वर्तन केले गेले. हा व्हिडिओ दिल्लीतल्या पहाडगंज भागातला आहे असे सांगण्यात येते आहे. संबंधित मुलीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र, नंतर तिने तो डीलीट केला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 3 मुलांना ताब्यात घेतले आहे. जपानी तरुणी भारत सोडून बांगलादेशात गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जपानी तरुणीनेच तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता.सध्या तो व्हिडिओ वेगवेगळ्या अकाऊंटवरुन शेअर केला जात आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला एक मुलगा या तरुणीला घट्ट पकडून तिच्या दोन्ही गालावर रंग लावताना दिसत आहे. तेवढ्यात शेजारी उभा असलेला मुलगा जोरात तिच्या डोक्यावर अंड फोडतो. तेवढ्यात दुसरा मुलगा येऊन तिला पकडतो आणि त्यानंतर तिच्यावर रंगाचा स्प्रे देखील मारला जातो. अशाच प्रकारे तिथे उपस्थित अनेक मुले तिला रंगवतात, पकडून ठेवतात. ती नाही म्हणत राहिली, पण मुलांनी ऐकले नाही.

याप्रकरणी पोलिसांनी जपानी दूतावासाला पत्र लिहिले असून, त्यात आरोपी मुलांवर कारवाई करण्याचे म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. सेंट्रल डिस्ट्रिक्ट पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसरीकडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवून याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की, होळीच्या दिवशी परदेशी मुलीसोबत असे कृत्य होणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.

एक दिवस आधी, दिल्लीतून असाच एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये काही लोक होळीच्या दिवशी मुस्लिम महिलांवर रंगाच्या पाण्याने भरलेले फुगे फेकताना दिसत होते. हा व्हिडिओ मीर फैसल नावाच्या व्यक्तीने ट्विट केला आहे.या घटनेवरही स्वाती मालीवाल यांनी आक्षेप नोंदवला होता.

Scroll to Top