रक्ताचा सडा! छिन्नविछिन्न मृतदेह! हंबरडे मध्यरात्रीही रक्तदात्यांची मदतीसाठी रांग

बालासोर – ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या अपघाताचे दृश्य भीषण होते. रेल्वेच्या डब्यांचा पार चेंदामेंदा झाला होता. अपघातानंतर सर्वत्र रक्ताचा सडा व छिन्नविछिन्न मृतदेह पडले होते. हंबरडे आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या. मात्र, अपघातात जखमी झालेल्यांसाठी रुगणालयात रक्तदात्यांच्या रांगांतून माणुसकीही बघायला मिळाली.
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी तीन रेल्वे गाड्यांचा भीषण अपघात झाला. या अपघाताच्या भीषणतेच्या कहाण्या आता बाहेर येत आहेत. यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या एका प्रवाशाने सांगितले की, हा अपघात इतका भीषण होता की, आवाजाने कानठळ्या बसल्या. माझ्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखे मला वाटले. आमच्या ट्रेनचे चार डबे रूळावरून उतरले होते. अनेक जण त्याखाली दबले गेले होते. खूप अंधार होता. त्यामुळे मला फक्त अनेकांचा रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज येत होता. त्याचवेळी दुसरी ट्रेन धडधडत आली आणि रुळांवरील डब्यांवर आदळली.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, रेल्वेच्या धडकेचा आवाज अतिशय भयंकर होता. आम्ही पोहोचलो तेव्हा त्या ठिकाणी हातपाय नसलेले अनेक मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले होते. अनेक नागरिक आपल्या जीवलगांना शोधत होते. ते दृश्य भयंकर होते.
हावडा येथून कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये चढलेला एनडीआरएफ जवान व्यंकटेश या अपघातात थोडक्यात बचावला. त्याला काही जखमा झाल्या असल्या तरी त्या गंभीर नव्हत्या. मोबाईलच्या प्रकाशाने त्याने ट्रेनच्या डब्यातून अनेक मुलांना बाहेर काढले. त्याने आपल्या युनिटच्या इन्स्पेक्टरला या अपघाताची माहिती दिली. ही माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत पोहोचली. त्यामुळे राज्याचे एनडीआरएफचे पथक तासाभरात
घटनास्थळी पोहोचले.
एनडीआरएफची नऊ पथके बचावकार्यात सहभागी होती. या पथकांत 300 हून अधिक जवान होते. त्यांच्याबरोबर भारतीय सैन्याच्या जवानांनाही बचावकार्यात सहभागी करण्यात आले होते. भारतीय सेनेचे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विभागही बचावकार्यात सहभागी झाले होते. तर वायुसेनेची एम-17 हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आली होती.
या अपघातावेळी माणुसकीचेही दर्शन घडले. स्थानिक लोक मदत आणि बचावकार्यासाठी धावून आले. अपघात झाल्याचे कळताच लोक स्वतःहून जवळच्या रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी पोहोचू लागले. रात्री बारा वाजता बालासोर मेडीकल कॉलेजमध्ये रक्तदात्यांची मोठी रांग लागली होती. त्यात तरुणांची संख्या मोठी होती. काही जण 2 तास रांगेत उभे होते. काही तासांमध्ये रक्तदानासाठी 2,000 जणांनी नोंदणी केली आणि 900 युनिट रक्त जमा झाले. जखमींना रक्तदान करण्यासाठी काही ठिकाणी आरोग्य विभागानेही शिबिराचे आयोजन केले होते.
अडीचशेहून अधिक प्रवाशांचा बळी घेणारा हा अपघात कसा घडला, यावरून आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघात टाळणारी ‘कवच’ यंत्रणा रेल्वेने का वापरली नाही, असे म्हणत विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
रेल्वे अपघात टाळण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून कवच नावाची प्रणाली भारतीय रेल्वेने आणली आहे. परंतु ही यंत्रणा अजून सगळ्या मार्गावर बसवण्यात आलेली नाही. शुक्रवारी अपघात झालेल्या मार्गावरही ही प्रणाली बसवलेली नव्हती, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ही प्रणाली असती, तर अपघात टळला असता, हा मुद्दा पकडून विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहे.
या रेल्वे अपघाताबाबत ट्वीट करत काँग्रेस संसद अधीर रंजन चौधरी यांनी असा सवाल केला आहे की, आम्ही सुरक्षा कवच लावतोय, त्यामुळे सगळे अपघात टळतील, असे रेल्वेने सांगितले होते. पण सुरक्षा कवच कुठेय, तीन रेल्वेगाड्या एकमेकांवर कशा आदळल्या?
तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी आरोप केला आहे की, रेल्वे अपघातांना रोखण्यासाठी टक्करविरोधी यंत्रणा बसवण्याऐवजी केंद्र सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांची हेरगिरी करण्यासाठी सॉफ्टवेअरवर करोडो रुपये खर्च करत आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार केवळ बढाया मारते.
या सरकारने गाड्यांच्या सुरक्षेसाठी काहीच केले नाही. केंद्राच्या उदासीनतेचा आणि कृतिशून्यतेचा फटका गरीब आणि उपेक्षितांनाच सहन करावा लागतो. मग ते नोटाबंदी असो, जीएसटी असो, लॉकडाऊन असो, शेतीविषयक कायदे असोत किंवा रेल्वे सुरक्षा असो.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी, या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते बिनय विश्वम यांनीही अपघाताबद्दल सरकारला दोष देत म्हटले, सरकारचा भर केवळ आलिशान गाड्यांवर आहे. सर्वसामान्यांच्या गाड्या आणि ट्रॅक दुर्लक्षित आहेत. ओडिशातील अपघातातील मृत्यू याचाच परिपाक आहे. या अपघाताची जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा.
माजी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनीही या अपघाताबद्दल सरकारला धारेवर धरत प्रतिक्रिया दिली की, रेल्वेच्या बेजबाबदारीमुळे हा अपघात झाला आहे. सरकारने सगळ्या रेल्वे व्यवस्थेचीच वाताहात केलीय.
काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी 1956 साली महबूबनगर येथे रेल्वे अपघात झाल्यावर तत्कालीन रेल्वेमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी दिलेल्या राजीनाम्याची आठवण करून दिली आहे. त्यांनी म्हटले की, मुळात रेल्वे मंत्री असतात कुठे हाच प्रश्न आहे. देशात कुठेही रेल्वेला हिरवा झेंडा दाखवायचा असेल तर पंतप्रधानच असतात. ओडिशातील रेल्वे अपघाताची जबाबदारी निश्‍चित झाली पाहिजे.
भाजपकडून या टीकेवर पलटवार करण्यात आला आहे. खासकरून तृणमूल काँग्रेसला उत्तर देताना भाजपने म्हटले आहे की, या दुःखद घटनेचे राजकारण केले जात आहे. ममता बॅनर्जी केंद्रीय रेल्वेमंत्री होत्या, त्यावेळी झालेल्या अपघाताची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला होता का?
या अपघातातील बचावकार्य शनिवारी संध्याकाळी संपले. त्यानंतर रेल्वेमार्ग सुरळीत करण्याचे काम सुरू झाले. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील बालासोर येथे जाऊन घटनास्थळाला भेट दिली. मोदी यांनी अपघातातील जखमींचीही भेट घेतली. या मदतकार्यात सहभागी असलेल्या सगळ्यांचे त्यांनी आभार मानले. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना दहा लाख आणि जखमींना दोन लाख रुपये देण्याची घोषणा सरकारने केली आहे. हा अपघात मानवी चूक, सिग्नल यंत्रणेतील बिघाड की आणखी कुठल्या कारणामुळे झाला, हे तपासाअंतीच कळेल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top