नवी दिल्ली- काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आज आपले बंधु आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काही जुने फोटो शेअर केले आहेत. प्रियंका गांधी यांनी शेअर केलेल्या या फोटो कोलाजमधील एका फोटोत त्या आणि राहुल गांधी एका छोटयाशा गाडीसोबत खेळत आहेत. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सोबतचा फोटोदेखील शेअर केला आहे. या पोस्टमध्ये, प्रियांका गांधी यांनी भाऊ-बहिणीच्या नात्याची रंगीबेरंगी फुलांशी तुलना केली आहे. त्यांनी लिहिले की, भाऊ आणि बहिणीचे नाते हे एका फुलांच्या बागेसारखे असते, ज्यामध्ये आदर, प्रेम आणि परस्पर समंजसपणा, वेगवेगळ्या रंगीबेरंगी आठवणी, एकजुटीच्या गोष्टी आणि मैत्री अधिक दृढ करण्याचा संकल्प फुलतो. भाऊ-बहिणी हे संघर्षाचे सोबती, आठवणींचे सहप्रवासी देखील असतात.
