रशिया चीनबरोबर चंद्रावर उभारणार अणुउर्जा प्रकल्प

मॉस्को – चंद्रावर मानवाने पहिले पाऊल टाकल्यापासून या चंद्रावर वस्ती करण्याची माणसाची मनिषा लपून राहिलेली नाही. भविष्यातील या मानवी वस्तीसाठी किंवा चंद्रावरील ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी रशिया चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे. रशिया चीनच्या सहकार्याने हा अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. याच्या मदतीने चंद्रावरील तळाची ऊर्जेची गरज भागवली जाणार आहे.रशिया आणि चीनसोबत भारतही या प्रकल्पात सहभागी होण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात देण्यात आली आहे. रशियाच्या व्लादिवोस्तोक शहरात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रशियाच्या स्टेट न्यूक्लियर एनर्जी कॉर्पोरेशन, रोसाटोमचे प्रमुख अलेक्सी लिखाशेव म्हणाले की, हा प्रकल्प बहुराष्ट्रीय आहे. आमचे भागीदार देश चीन आणि भारत देखील या प्रकल्पात रस घेत आहेत. २०३५ पर्यंत हा अणुउर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याची आमची योजना आहे. काही महिन्यांपूर्वी रशियन स्पेस एजन्सी रोसकॉसमॉसचे सीईओ युरी बोरिसोव्ह म्हणाले होते की २०३३ – ३५ मध्ये रशिया आणि चीन एकत्रितपणे चंद्राच्या पृष्ठभागावर अणुऊर्जा प्रकल्प उभारतील. उर्जा प्रकल्प चंद्राच्या पृष्ठभागावर नेण्यासाठी रशिया अणुऊर्जेवर एक स्वयंचलित कार्गो रॉकेट बनवेल. ते पूर्णपणे स्वयंचलित असेल व ते उडवण्यासाठी माणसांची गरज भासणार नाही, मानवाला फक्त प्रक्षेपणावर लक्ष केंद्रित करावे लागेल. रोसटॉमच्या या प्रकल्पाचा उद्देश चंद्रावर एक छोटा अणुऊर्जा प्रकल्प उभारणे हे आहे. त्याच्या मदतीने ०.५ मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. यामुळे चंद्रावर उभारण्यात येत असलेला तळ चालवण्यास मदत होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top