बुलढाणा – बुलढाण्यातील भेंडवळमध्ये काल अक्षय्य तृतीयेला घट मांडणी करण्यात आली आणि आज सकाळी त्याचे भाकित जाहीर करण्यात आले. या भाकितानुसार राजा (पंतप्रधान) कायम राहणार आहे. मात्र तो सतत तणावात राहील. कारण अनेक राजकीय उलथापालथ सतत होणार आहेत. देश सुरक्षित राहणार असला तरी शेजारील राष्ट्रांच्या कुरघोडी सतत होत राहतील. यावर्षी नैसर्गिक आपत्ती ओढावतील. भूकंपांचे प्रमाण वाढेल. पिकात रोगराई पसरेल. जून महिना कोरडा जाणार असून, ऑगस्टमध्ये अतिवृष्टी होणार आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर चंद्रभान महाराजांचे वंशज पुजांजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे.
शेतात खड्डा, खड्ड्यात मातीचा घट, घटात पाणी व त्यावर कुरड्या. त्याच्या बाजूला पान सुपारीसह विविध 18 प्रकारची धान्ये अशा या घट मांडणीतून वर्षभराच्या सर्वच घडामोडींचा अंदाज घेतला जातो. त्यानंतर घटमांडणीत वर्तवण्यात आलेल्या अंदाजावरून राज्यातील शेतकरी आपल्या वर्षभराचे पीक पाण्याचे नियोजन करतात. त्यामुळे या घटमांडणीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना, आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी या मांडणीतील घटात झालेल्या बदलावरून वर्षभराचे नियोजन आणि अंदाज वर्तवण्यात आले. नैसर्गिक आपत्ती येत राहतील, भूकंप प्रमाण जास्त असेल, अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे. यंदा पर्जन्यमान सर्वसाधारण असेल, जून महिन्यात कमी पाऊस पडणार आहे. त्यामुळे पेरणी उशिरा होईल.जुलै महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडेल आणि अतिवृष्टी देखील होईल. सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल, पण अवकाळी पाऊस भरपूर होणार असून, पिकांचे नुकसान होईल. यावेळी विंचू निघाला असल्याने पिकांवर रोगराई पडणार आहे.
कापसाचे पीक उत्पादन मध्यम प्रमाणात होईल, कापसात तेजी असेल. तूर, मुग आणि उडीद, ज्वारी पीक सर्वसाधारण राहील. अशीही भविष्यवाणी करण्यात आली आहे. तांदळाचे चांगले पीक येईल. गहू सर्वसाधारण बाजार भाव तेजीत राहील. हरभरा अनिश्चित कमी जास्त पीक येईल. मात्र नुकसान सुद्धा होईल.
देशासंबंधीचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. त्यानुसार, संरक्षण मजबूत राहील. मात्र शेजारील राष्ट्राच्या कुरघोड्या सुरूच असतील. देशाची आर्थिक परिस्थिती खालावेल, चढउतार होईल. राज्यात राजकीय उलथापालथी होतील, राजा कायम तणावात असेल, असे भाकित भेंडवळच्या भविष्यवाणीत वर्तवण्यात आले आहे.
राजा तणावात! राजकीय अस्थिरता जूनला पाऊस नाही! ऑगस्टला अतिवृष्टी
