नवी दिल्ली – देशात गेल्या २४ तासांत कोरोना संसर्ग झालेल्या ३६४१ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर कोरोना रुग्णांचा आकडा आता २०,२१९ वर आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २४ तासांत कोरोनामुळे आणखी ११ जणांचे मृत्यू झाले आहेत. या ११ मृत्यूंपैकी तीन रुग्ण महाराष्ट्रातील आहेत, तर दिल्ली, केरळ, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
याशिवाय केरळने कोरोना मृतांच्या आकड्यांचा ताळमेळ साधून यादीत आणखी चार नावे जोडली आहेत. आकडेवारीनुसार, भारतात संसर्गाचा दैनंदिन दर ६.१२ टक्के आणि साप्ताहिक दर २.४५ टक्के नोंदवला गेला आहे. दरम्यान या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४,४१,७५,१३५ झाली आहे, तर मृत्यूचे प्रमाण १.१९ टक्के आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोरोना विरोधी लसींचे २२०.६६ कोटी डोस देण्यात आले आहेत. शनिवारी देशात कोरोना विषाणूचे ३८२४ नवे रुग्ण आढळले आहेत.