मुंबई:
मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. लातूर, वाशिम आणि परभणी, हिंगोली,पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पिकांना तडाखा बसला आहे. परभणीतील पाच तालुक्यात गारपीटीने मोठे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार वाऱ्यासह गाराचा पाऊस झाला. वाशिमच्या शेलुबाजार परिसरात अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गारपीट व अवकाळी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये भर दुपारी पावसामुळे अंधार पडला. विजांचा कडकडाट, ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मिट्ट काळोखामुळे संध्याकाळप्रमाणे वातावरण भर दुपारी होते.
लातूर जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. कर्नाटक महाराष्ट्र सीमावरती भागातील औराद शहाजानी जवळील जमखंडी येथील पुलावरुन पावसाचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. लातूर येथे झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनावरांचा मृत्यू झाला. वीज कोसळून आरुषा नथुराम राठोड या 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.
शुक्रवारी पुण्यात सकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली होती. शहरातील कोथरूड परिसर, हडपसर, मांजरी परिसरात जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पपई, आंबे यासह हळद, भुईमूग, उन्हाळी कांदा, उन्हाळी सोयाबीन, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील संत्रा बागांना गारपिटीचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे आणि गारपीटीमुळे आंबिया बहारातील संत्री गळून पडली. पावसामुळे आंबा, कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गारपीट व अवकाळी पाऊस झाला.