राज्यात पुढील पाच दिवस
अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई: – राज्यासह देशात पुढील पाच दिवस पूर्व भारत, वायव्य भारतासह पश्चिम हिमालयीन प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस, ढगांचा गडगडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील १० दिवसांत देशाच्या मध्य, उत्तर आणि पश्चिम भागात मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. सध्या कांदा, गहू, हरभरा या पिकांची काढणी सुरु आहे. अशातच अवकाळी पाऊस पडल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात गुरुवारी अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली.

मुंबईत काही ठिकाणी पावसाचा हलका शिडकावा झाला. त्यामुळे उकाड्याने हैराणा झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याचीही शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पिंपरी चिंचवड, सातारा, धुळे, वर्धा या जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. परभणीत गुरुवारी पहाटे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अनेक भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Scroll to Top