*हवामान खात्याचा इशारा
पुणे : मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. तर राज्यातील काही भागांत उष्णतेमध्ये वाढ झाली असतानां आता पुन्हा एकदा राज्यात पुढील ५ दिवस म्हणजे २४ ते २६ एप्रिलदरम्यान अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याचा फटका विदर्भाला मोठ्या प्रमाणात बसू शकतो. तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.
विदर्भात नागपूरसह बऱ्याच राज्यांमध्ये अवकाळी पावसाची स्थिती कायम राहणार आहे. विदर्भासह सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुण्यातील काही जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा बसू शकतो अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. २४ ते २६ एप्रिलदरम्यान पावसाचे प्रमाण अधिक असेल, तर आठवड्याच्या मध्यापासून ते कमी होण्यास सुरुवात होईल. मराठवाड्यात अवकाळीसोबतच पुढील दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच गारपीटीचा तडाखाही बसणार आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची काळजी वाढणार आहे. मुंबईसह कोकणात उष्णताही वाढल्याचे जाणवणार आहे. त्यामुळे नागरिकांनी देखल आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.