मुंबई – उन्हाळी सुट्यांमुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी नागरिक बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे रक्तदाते उपलब्ध नसल्याने रक्तदान शिबिरे भरवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी त्यामुळे रक्त तुटवड्याचे मोठे संकट राज्य रक्त संक्रमण परिषदेसमोर उभे ठाकले आहे. राज्यात ६ मे पर्यंत फक्त ५८ हजार ८१८ युनिट म्हणजे पुढील २० दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे.बआगामी काळात रक्तटंचाई निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान शिबिरे भरवावीत, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सह संचालक डॉ. महेंद्र केंद्रे यांनी केले आहे.
राज्यात ३५० तर मुंबईत ५७ अधिकृत रक्तपेढ्या आहेत. मुंबईत दररोज साधारण ५५० युनिट, तर राज्यात १५०० युनिटपर्यंत रक्त लागते. सध्या २० दिवस पुरेल इतका रक्तसाठा असला,/तरी तुटवडा भरून काढण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत.
सुट्यांमुळे चाकरमानी गावाकडे जाऊ लागले आहेत; मात्र या काळातही शस्त्रक्रिया नियमित सुरू आहेत. उन्हाळ्यात रक्तटंचाईचे मोठे संकट उभे ठाकते. मागील आठवड्यात वांद्रे येथे झालेल्या रक्तदान शिबिरामुळे तब्बल आठ हजार २०० युनिट रक्त जमा झाले. त्यामुळे काही प्रमाणात रक्त उपलब्ध झाले आहे. आरोग्य यंत्रणेसह विविध सामाजिक संस्थांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले. मात्र गरज वाढल्याने उपलब्ध रक्तसाठा अपुरा पडण्याची शक्यता आहे./रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने सामाजिक संस्था तसेच रक्तपेढ्यांना आवाहन केले आहे. कोविड काळातही राज्य संक्रमण परिषदेने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपेपर्यंत सोसायटीच्या आवारात, कार्यालयात रक्तदान शिबिर घ्यावे, असे आवाहन केले जात आहे.