राज्यासह देशभरात रामनवमी उत्सव
उत्साहात साजरा! मंदिरांमध्ये गर्दी

मुंबई:

राज्यासह देशभरात रामनवमीचा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. महाराष्ट्रात नागपूर, नाशिक, सातारा, शिर्डी, शेगाव, मुंबईसह राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी राम नवमी साजरी केली. शिर्डी, शेगाव, पंढरपूर, आळंदीसह ठिकठिकाणी मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. मुंबईतल्या वडाळामधील राम मंदिरात देखील भाविकांची सकाळपासूनच गर्दी होती. दिल्लीतील झंडेवालान मंदिरात आणि छतरपूर मंदिरसह अयोध्येतील रामलल्ला यांच्या तात्पुरत्या मंदिरात रामनवमी साजरी करण्यात आली. रामनवमीसाठी विशेष तयारी करण्यात आली होती. रामललाच्या परिसर देशी-विदेशी फुलांची आरास करण्यात आली. शरयू नदीला वंदन करण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. देशभरातील लाखो भाविक अयोध्येत पोहोचले होते.

वडाळ्याच्या राम मंदिरात रामनवमी निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी अनेक भाविक राम मंदिरात पोहचले होते. रामनवमीला शिर्डीतील साई मंदिरात साई नामाच्या जयघोषणाने परिसर दुमदुमून गेला. गुरुवारी पहाटे काकड आरतीपासूनच शिर्डीत दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या होत्या. यंदाही बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथल्या संत गजानन महाराज मंदिरात रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडव्याला या उत्सवाची सुरुवात होऊन रामनवमीला मोठा उत्सव संत गजानन महाराज मंदिरात संपन्न झाला. नाशिकच्या काळाराम मंदिरातून रामनवमीचा उत्साह पाहायला मिळाला.

मुंबईच्या मुंबादेवी मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांनी लवकरच मुंबादेवी मंदिराचा विकास करणार असे आश्वासन दिले. रामनवमीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या राम नगर येथील मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्राचे दर्शन घेतले. रामनवमीनिमित्त खासदार नवनीत राणा यांचा व्हिडीओ समोर आला आहे. काळ्या रंगाचे कपडे घालून डोक्याला भगवा गमछा बांधला होता. बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरादेवी प्रसिद्ध आहे. रामनवमी निमित्त येथे भव्य यात्रा भरते. पुण्यातील तुळशी बागेतील राम मंदिर येथे राम जन्मोत्सव पार पडला. प्रतिकात्मक रामाची मुर्ती तयार करून त्या पाळण्यात ठेवण्यात आल्या. यावेळी रामभक्तांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.

Scroll to Top