राणीच्या बागेत पर्यटकांच्या भेटीला ३ पेंग्विन पिल्ले आणि २ बछडे

मुंबई –

भायखळा येथील महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) पर्यटकांना आता आणखी तीन पेंग्विन पाहायला मिळणार आहेत. पेंग्विन कक्षातील पेंग्विनच्या तीन जोडप्यांनी तीन पिल्लांना जन्म दिला आहे. त्यामुळे पेंग्विनची संख्या वाढून आता १५ झाली आहे. इथल्या वाघांच्या जोडीने जन्म दिलेले २ बछडेही पयर्टकांना पाहायला मिळणार आहेत.

राणीच्या बागेत तयार करण्यात आलेल्या पेंग्विन कक्षातील डोनाल्ड आणि डेझी या जोडीने २१ फेब्रुवारी २०२३ रोजी डोरा (मादी), मोल्ट आणि फ्लिपर या जोडीने २ ऑक्टोबर २०२२ रोजी सिरी (मादी), तर पपाय आणि ऑलिव्ह या जोडीने १३ डिसेंबर २०२२ रोजी निमो (नर) अशा तीन पिल्लांना जन्म दिला आहे. या उद्यानातील पेंग्विनसह वाघांचे कुटुंबही विस्तारले आहे. ‘शक्ती आणि करिश्मा’ या रॉयल बेंगॉल टायगरच्या जोडीने ४ नोव्हेंबर २०२२ रोजी दोन बछड्यांना जन्म दिला. हे दोन्ही बछडे त्यांच्या आवारात सैर करीत असतात. पुढील दीड ते दोन वर्षे या बछड्यांना त्यांच्या आईसोबतच ठेवण्यात येणार आहे. पर्यटकांना एक दिवसाआड जय आणि रुद्रसह करिश्माला तर दुसऱ्या दिवशी शक्तीला पाहण्याचा आनंद उद्यापासून घेता येणार आहे, असे उपायुक्त किशोर गांधी, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल राऊळ यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top