मुंबई- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी २००५ मध्ये शिवसेना सोडल्यानंतर दैनिक सामनाच्या कार्यालयाबाहेर घेतलेली सभा उधळण्यात आली. या गोंधळाप्रकरणी मंगळवारी तब्बल १८ वर्षांनी मुंबई सत्र न्यायालयाने आरोप निश्चित केले. यात आमदार अनिल परब यांच्यासह शिवसेना, मनसे आणि ठाकरे गटाच्या आजी-माजी ३८ लोकप्रतिनिधी-कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी न्यायालयात हजर असलेल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमुखाने आरोप अमान्य केले.
मंगळवारी न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या न्यायालयात सर्वांनी दोषारोप निश्चित करण्यासाठी हजेरी लावली. प्रत्येकानेच स्वतःवरील आरोप अमान्य केल्यानंतर ‘चला, याबाबत तरी तुमच्यात एकमत आहे’, अशी मिश्किल टिप्पणी न्यायालयाने केली. यावर सर्वांनीच हसून दाद दिली. दरम्यान, १८ वर्षांपूर्वी मतभेदामुळे राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना कार्यालयाबाहेर जाहीर सभा आयोजित केली होती. राणे यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ या सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसेना नेत्यांसह शिवसैनिक हजर होते. शिवसैनिकांनी राणेंच्या सभेत गोंधळ घालण्याचा आणि ती सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. त्यात अनेकजण गंभीररित्या जखमी झाले होते. सभा उधळल्याप्रकरणी ३८ आरोपींवर गुन्हा दाखल झाला. यामध्ये आमदार-खासदारांचा समावेश आहे. दादर पोलिस ठाण्यात ४७ जणांवर एकूण ५ गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी ५ आरोपींचा मृत्यू झाला.
राणेंची सभा उधळणाऱ्यांवर १८ वर्षांनी आरोपनिश्चिती
