पुणे :
न्यायमूर्ती गोविंद महादेव रानडे यांच्या स्मृतीत रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेल्या रानडे ट्रस्टला फसवून जमीन बळकावल्याचा आरोप देशमुख-काळे या जावई-मेहुणे जोडीवर करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे १६ एकर जमीन स्वतःच्या नावे केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी गंभीर दखल न घेतल्याने ट्रस्टचे सदस्य असलेल्या सुनील भिडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी संस्थेचे पदाधिकारीच गैव्यवहार करीत असल्याचे लक्षात आणून दिले.
रानडे ट्रस्ट ही ‘सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी’ या संस्थेची दानदात्री आणि मार्गदर्शक संस्था आहे. २०१८ मध्ये ट्रस्टचे नवनियुक्त सदस्य म्हणून सुनील भिडे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर भिडे यांनी रानडे ट्रस्टचा अभ्यास केला. ट्रस्टच्या कागदपत्रांची तपासणी करताना संस्थेचे विद्यमान सचिव असलेल्या मिलिंद देशमुख यांनी त्यांचा मेहुणा असलेल्या सागर काळे आणि त्यांचा मित्र असलेले शिवाजी धनकवडे या तिघांची नावे ट्रस्टच्या नावावर असलेल्या सातबार्यावर दिसून आली होती.
त्या वेळी संस्थेच्या इतर पदाधिकार्यांनी एकमुखी निर्णय घेत मिलिंद देशमुख, सागर काळे, शिवाजी धनकवडे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेतला. सोबतच तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही पत्राद्वारे माहिती देत पुणे जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले होते. तत्कालीन डेक्कन पोलिस निरीक्षकांनी तक्रारीनंतरही काहीच कारवाई न केल्याने भिडे यांनी पोलिस उपायुक्त यांच्याकडे पुन्हा रीतसर तक्रार अर्ज पुन्हा दाखल केला होता. यानंतर भिडे यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना दोन पत्र पाठवून न्याय मागितला. उच्च न्यायालयाने तक्रारींची गंभीर दखल घेत धर्मादाय आयुक्त व उपायुक्तांच्या नावे पत्र जारी करून निर्णय घेण्याचे आदेश दिले.