लखनौ – अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जाहीर झाली नसली तरी विश्व हिंदू परिषद आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने या मंदिराच्या उद्घाटनासाठी भव्य-दिव्य कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी केली आहे. उद्घाटनाचा कार्यक्रम महिनाभर चालणार असून, उद्घाटनापूर्वीही वातावरण निर्मितीसाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन पुढील वर्षी जानेवारी महिन्यात होणार असल्याचे सांगितले जात आहे. उद्घाटनाची नेमकी तारीख अद्यापी जाहीर करण्यात आलेली नाही. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी काल अयोध्येत दोन दिवसीय चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच, उद्घाटन कार्यक्रमाची रूपरेषाही ठरवण्यात आली आहे. या उद्घाटनाची जबाबदारी सांभाळणार्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने उद्घाटनाच्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे. त्यानुसार राम मंदिराचा कार्यक्रम भव्य-दिव्य स्वरूपात होणार असून, तो महिनाभर चालणार आहे.
अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल म्हणाले की, 22 जानेवारी 2024 ही तारीख तिथी मुहूर्तासाठी सर्वोत्तम आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीच्या तारखेबाबत अद्याप लेखी उत्तर मिळालेले नाही. आम्ही त्यांच्याकडे 15 ते 24 जानेवारी 2024 दरम्यानची तारीख मागितली आहे. त्यातील 22 जानेवारी आम्हाला सर्वोत्तम वाटते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिवशी देशभरातील मठ आणि मंदिरांमध्ये पूजा, पठण, यज्ञ, हवन आणि आरती होईल. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण देशभरातील आणि परदेशातील सुमारे दोन लाख मंदिरांमध्ये केले जाईल. महिनाभर चालणार्या या उद्घाटन सोहळ्यात अनेक कार्यक्रम होणार आहेत.
उद्घाटनाआधी वातावरण निर्मितीसाठी विहिंपची एक शाखा असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून देशभर शौर्ययात्रा आणि संत, महंतांच्या पदयात्रा काढल्या जाणार आहेत. किमान 5 लाख गावांतून ही पदयात्रा काढण्याचे नियोजन आहे. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशातील घराघरात पाच दीप प्रज्वलित केले जाणार आहेत.
राम मंदिर उद्घाटनासाठी विहिंपचा भव्य कार्यक्रम
