पुणे – पिंपरी-चिंचवड परिसरातील रावेरमध्ये मोठे होर्डिंग्ज अंगावर कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. आज संध्याकाळी ही घटना घडली. अचानक पाऊस आल्याने काही जण आडोशाला उभे राहिले होते. त्यावेळी त्यांच्यावर हे होर्डिंग्ज कोसळले.
पुण्यात आज संध्याकाळी वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे रावेत किवळे येथील कात्रज बायपास जवळच्या सर्व्हिस रोडवर पंक्चरच्या दुकानाजवळ आठ जण थांबले होते. अचानक जाहिरातीचे होर्डिंग्ज लोखंडी सांगाड्यासह खाली कोसळले. खाली उभे असलेले आठ जण या होर्डिंग्जखाली दबले गेले.
हे होर्डिंग्ज खासगी जागेत लावण्यात आले होते. ते रॉयल हेरिटेज मॉलकडे जाणार्या रस्त्यावर कोसळले. या घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस आणि रावेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिक आणि पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या मदतीने अडकलेल्या आठ जणांना बाहेर काढले. मात्र त्यातील 5 जणांचा मृत्यू झाला.
रावेरमध्ये वादळी वार्यामुळे होर्डिंग्ज कोसळले! पाच ठार
