राष्ट्रवादीचा सुनियोजित कार्यक्रम संपला! शरद पवारच अध्यक्ष तू दादा आहेस, दादाच राहा! साहेब बनू नको! स्पष्ट संदेश

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचा 2 मे रोजी सुरू झालेला सुनियोजित कार्यक्रम आज अखेर संपला. शरद पवार यांनी आपली ताकद दाखवली आणि अजित पवारांना त्यांची जागा दाखवली. राजकारणातील चाणक्याने अजित पवारांचा बंडाचा डाव उधळत पक्षातील आपले स्थान बळकट केले. ‘तू ‘दादा’ आहेस दादाच राहा, साहेब बनू नको’ हा या संपूर्ण चित्रपटाचा सर्वात ताकदवान संदेश होता. शरद पवार अध्यक्षपदी कायम राहिले. उत्तराधिकारी ही संकल्पना पक्षात नाही हेही बोलले. आजच्या पत्रकार परिषदेत अजित पवार हजर नव्हते यातच सर्व आले. आता काही दिवस थंड राहून सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अजित पवार काय करतील हे कळेलच. महाराष्ट्र खर्‍या राजकीय भूकंपाच्या केंद्रबिंदूवर आता आला आहे.
शरद पवारांनी राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांना अजित पवारांबद्दल अनेक प्रश्‍न विचारले गेले तेव्हा ते म्हणाले की, माझे सर्व सहकारी हे माझे उत्तराधिकारी आहेत. उत्तराधिकारी नेमणे ही संकल्पना आमच्याकडे नाही. सर्व मिळून काम करतील. जिल्हा पातळीवरील नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. अजित पवार पत्रकार परिषदेला उपस्थित नाहीत असे विचारता ते म्हणाले की, माझ्या पत्रकार परिषदांना सर्व नेते उपस्थित नसतात. सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा विचार होता का? या प्रश्‍नाला उत्तर देताना यात काही तथ्य नाही, असे पवार म्हणाले.
आज सकाळीच अध्यक्षपद याबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीचे एकेक दिग्गज नेते राष्ट्रवादी भवनात दाखल झाले. बैठकीला जाताना कुणीच पत्रकारांशी बोलले नाही. अजित पवार यांचा चेहरा मात्र पूर्ण पडला होता. सकाळी 11 वाजता समितीची बैठक सुरू झाली. यात सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, के.के. शर्मा, धनंजय मुंडे, पी.सी. चाको, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, फौजिया खान, हेमंत टकले, राजेश टोपे, छगन भुजबळ, जयदेव गायकवाड, वंदना चव्हाण, सोनिया दुहन, एकनाथ खडसे उपस्थित होते.
ही बैठक सुरू असताना बाहेर शरद पवार समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. राजीनामा मागे घ्या, अशी जोरदार घोषणाबाजी सुरू होती. ‘मी साहेबांसोबत’ असे लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या. वारकर्‍यांनी येऊन भजन सुरू केले. अजित पवार येताच ‘देश का नेता कैसा हो, पवारसाहेब जैसा हो’ या घोषणा अधिकच तीव्रपणे दिल्या गेल्या. साहेब, साहेब आणि साहेबच अशी बॅनरबाजी भवनाजवळ होती. त्यातच अजित झा नावाच्या कार्यकर्त्याने स्वत:वर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने काही काळ
खळबळ उडाली.
शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा हेच समितीतील सर्वांचे मत आहे असे सांगण्यात येत असले तरी बैठकीत चार नेत्यांनी वेगळे मत मांडल्याची चर्चा होती. शरद पवारांच्या निर्णयाचा सन्मान राखावा. नवीन कार्याध्यक्ष पद निर्माण करावे आणि कार्याध्यक्षाच्या नावाची घोषणा शरद पवारांनीच करावी, असे या चार नेत्यांचे म्हणणे असल्याचे सांगितले जात होते. मात्र जयंत पाटील यांनी हे वृत्त फेटाळून लावत शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, असे एकमताने ठरल्याचे सांगितले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला जे कार्यकर्ते होते त्यात रक्षणा सलगर आणि मेहबूब शेख यांचा पुढाकार होता. दोघेही युवा संघटनेचे आहेत, सुप्रिया सुळे समर्थक आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचे आंदोलन उत्स्फूर्त आहे की, पूर्वनियोजित अशी पहिल्यापासूनच शंका व्यक्त होत आहे.
समितीची बैठक जेमतेम एक तास चालली आणि मग पावणेबारा वाजता पत्रकार परिषद घेत प्रफुल्ल पटेल म्हणाले की, 2 मे रोजी शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यांनी अध्यक्षपद निवडीसाठी समिती गठीत केली. मला या समितीचा निमंत्रक केले. त्यांच्या निर्णयाने आम्ही स्तब्ध झालो. आम्हाला त्यांच्या निर्णयाची कल्पना नव्हती. तेव्हापासून अनेक नेते व कार्यकर्ते यांनी त्यांना निर्णय मागे घेण्याची सतत विनंती केली. दिग्गज नेत्यांनीही शरद पवार, सुप्रियाताई आणि माझ्यापर्यंत हीच भावना व्यक्त केली. या भावना आम्ही नजरअंदाज करू शकत नाही. आज समितीची बैठक झाली. आम्ही सर्वानुमते ठराव मंजूर केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत आहे.
आम्ही हा ठराव घेऊन पवारसाहेबांना भेटून विनंती करणार आहोत. त्यांनी अध्यक्ष पदावर कायम राहावे, अशी आमची इच्छा आहे. आता आम्ही शरद पवारांची वेळ घेऊन त्यांना भेटायला जाऊ.
ही घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या घातल्या. फटाके फोडले. पुष्पवृष्टी केली. त्यानंतर सर्वात आधी अजित पवार सदनातून बाहेर आले. काही न बोलता ते निघून गेले. सर्व नेते तिथून शरद पवारांना भेटायला गेले असे सांगण्यात आले. छगन भुजबळ हे निघताना म्हणाले की, शरद पवारांना राजीनामा मागे घ्यावाच लागेल. कार्याध्यक्ष नेमणे वगैरे काही नाही. सुनील तटकरे म्हणाले की, शरद पवारांना त्यांचा निर्णय मागे घ्यावाच लागेल आणि आजच निर्णय होईल. जितेंद्र आव्हाड यांनी बाहेर येताच शहाळ्याचे पाणी घेतले. सुप्रिया सुळे काहीही न बोलता गेल्या.
‘राष्ट्रवादी भवन’ येथून निघालेले काही नेते शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर गेले आणि शरद पवारांना भेटून समितीचा ठराव त्यांना सादर केला. त्यानंतर प्रफुल्‍ल पटेल पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, समितीचा प्रस्ताव आम्ही शरद पवारांना सादर केला. शरद पवारांनी निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ मागितला आहे. त्याचवेळी संजय राऊतांनी ट्वीट करीत म्हटले की, समितीचा हा निर्णय अपेक्षित होता. शरद पवारांशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यांनी निवडणूक संपेपर्यंत अध्यक्षपदावर राहावे.
दुपारी साडेतीनच्या सुमारास संजय राऊत हे सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्याआधी त्यांनी सकाळी ट्वीट केले की, राजकारणात अपघाताने काहीच घडत नाही. जर एखादी घटना घडली तर ती पूर्णपणे पूर्वनियोजित असते हे पैज लावून सांगतो. दिवसभराच्या घडामोडींनंतर सायंकाळी 5.30 वाजता शरद पवार यशवंतराव प्रतिष्ठानला आले. त्यांच्यासह गाडीत पत्नी प्रतिभा पवार आणि रोहित पवार होते. ढोलताशांचा गजर आणि गुलाब पाकळ्यांची उधळण करून त्यांचे स्वागत झाले. पत्रकार परिषदेवेळी प्रफुल्‍ल पटेल, अनिल देशमुख, पी.सी.चाको, जयंत पाटील आणि दुसर्‍या फळीचे काही नेेते
उपस्थित होते.
यानंतर राजीनामा नाट्यावर पडदा पडला आहे. मात्र नजीकच्या भविष्यात राजकीय भूकंप होईल हे निश्चित आहे.

सत्ता राखण्यासाठी वेगाने हालचाली कराव्या लागतात!
‘लोक माझे सांगाती’ पुस्तकात शरद पवार लिहितात- काही विषय उद्धवशी संपर्क करून मी कानांवर घालायचो, काय करायला हवं, याबाबतही सूचना करायचो. त्या सूचनांवर कार्यवाही होत असे, असाही माझा अनुभव आहे. राज्याच्या प्रमुखाला राज्यातल्या घडामोडींची बित्तंबातमी हवी. त्याचं यावर बारीक लक्ष हवं. उद्या काय होऊ शकेल, याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी आणि त्यानुसार आजच काय पावलं उचलायला पाहिजेत, हे ठरवण्याचं राजकीय चातुर्य हवं. या सर्व बाबतीत आम्हाला सर्वांनाच टाळता आलं असतं. राजकारणात सत्ता राखण्यासाठी वेगानं हालचाली कराव्या लागतात.

माझ्यावरील प्रेम पाहून भारावलो
शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, मी घेतलेल्या निर्णयाने जनमानसात तीव्र भावना उपस्थित झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी अस्वस्थ झाले. मी फेरविचार करावा असे मला आवाहन केले. मी त्यांच्या भावनांचा अनादर करू शकत नाही. माझ्यावरील प्रेम बघून मी भारावून गेलो. समितीचा निर्णय मला कळला. या सर्वांचा विचार करून मी निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे. यापुढे मी नवे नेतृत्त्व घडविणे, संघटनात्मक बदल करणे यावर भर देणार आहे.

पत्रकारांना मटण-भाकरी
राष्ट्रवादीतील घडामोडीचे वृत्तांत देण्यासाठी पत्रकार सतत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला काल आणि आज बसून होते. पक्षातर्फे काल त्यांना चहा आणि पोहे दिले तर आज कल्याणहून त्यांच्यासाठी मटण – भाकरी मागवली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top