मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार? या चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. अजित पवार मागील काही दिवसांपासून अस्वस्थ आहेत, अशाही चर्चा सुरू आहेत. या चर्चा थांबतच नाहीत. अशातच आज विधान भवनात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि अजित पवारांच्या गोटातील सुनील तटकरे यांनी मुंबईत येऊन अजित पवारांची भेट घेतली. मी विधान भवनात येऊन मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, असे अजित पवारांनी पत्रकारांना सांगितले. तरीही हे दोन मोठे नेते भेटीला का आले होते? हा प्रश्न राहिलाच आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या मागे सुरू झालेली ईडीची पीडा काही थांबलेली नाही. मुश्रीफ यांना ईडी प्रकरणात अटकेपासून दिलेले संरक्षण 27 एप्रिलपर्यंत होते. ते पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवण्यात आले. त्याबाबत ते मुंबईला आलेले असताना सुनावणीच्या आधी त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. मात्र, त्यांच्या भेटीमुळे अनेक राजकीय चर्चांना उधान आले आहे. या भेटीचे संबंध अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाशी लावला जात आहे. तर दुसरीकडे सुनील तटकरे यांनीदेखील पवारांची भेट घेतली. अजित पवार आपल्याकडील संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशीच चर्चा यामुळे रंगली.
दरम्यान, कर्नाटक निवडणुकीनंतर देश आणि राज्यात मोठ्या घडामोडी होणार आहेत. 13 मे नंतर या घडामोडी घडणार आहेत, असा दावा करत संजय राऊत यांनी सकाळीच पत्रकार परिषदेत खळबळ उडवून दिली आहे. 13 मे नंतर नेमक्या काय घटना घडणार आहेत हे मात्र राऊतांनी सांगितले नाही. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात असून, 13 मे नंतर राज्याला नवीन राजकीय नाट्य पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राजकीय चर्चा रंगत असताना शरद पवार सगळ्यांपासून दूर पंजाबला प्रकाश सिंग बादल यांच्या अंत्यसंस्काराला गेले होते.
अजित पवार भावी मुख्यमंत्री
त्यातच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई, पुणे आणि नागपूर आणि उल्हासनगरात ‘अजित पवार भावी मुख्यमंत्री’ ‘वचनाचा पक्का, हुकुमाचा एक्का, मुख्यमंत्रिपदासाठी अजितदादाच पक्का’, ‘नाशिकची द्राक्षे नागपूरची संत्री, अजित पवारच होणार मुख्यमंत्री’ असे बॅनर या शहरात झळकले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये अजित पवार यांचे बॅनर लावून अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. मुंबई, पुणे, नागपूर इत्यादी शहरांमध्ये बॅनरबाजी केली जात आहे. आता ही बॅनरबाजी ठरवून केली जात आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.
दरम्यान, अमोल कोल्हे काल सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला. जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसजवळ जयंत पाटलांच्या ताकदीचा दुसरा उमेदवार नाही, असे वक्तव्य कोल्हे यांनी केले. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरुन राष्ट्रवादीतील घमासान होणार हे पुन्हा
उघड झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 दिग्गज नेते अजित पवारांच्या भेटीला
