नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला होता. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर आता सीपीआय आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांना दिलेले बंगले लवकरच रिकामे करण्यास सांगितले जाऊ शकते. तर, तृणमूल काँग्रेसला दिल्लीत पक्ष कार्यालय उघडण्यासाठी दिलेल्या जमिनीवरील ताबा सोडावा लागू शकतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिल्लीत पक्ष कार्यालयासाठी भूखंडाची मागणी करण्यात आली होती. राष्ट्रवादीकडून अनेक भूखंडांची पाहणी करण्यात आली होती. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला पसंत न पडल्यामुळे पक्ष कार्यालय बांधण्यात आले नव्हते. तर तृणमूल काँग्रेस पक्षाला दिल्लीतील दिनदयाळ उपाध्याय मार्गावर 1008 सेक्टर मीटरचा भूखंड देण्यात आला होता. मात्र, या जमिनीवर दोन मंदिरे आणि काही ठिकाणी अतिक्रमण होते. त्यामुळे नऊ वर्षांपूर्वी भूखंड मिळूनही तृणमूल काँग्रेसने त्याचा ताबा घेतला नव्हता. आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्याने हा भूखंड तृणमूलच्या हातातून जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्लीमधील बंगला लवकरच सोडावा लागणार
