मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर आज राज्यभरात आंदोलने आणि आक्रोश फार मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा होती. मात्र व्हॉटसअॅपवर नाराजी व्यक्त करण्यापर्यंतच मजल गेली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मात्र चर्चासत्र दिवसभर सुरू राहिली. शरद पवार सकाळीच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात येऊन बसले. तेथेच सर्व नेते एकेक करून त्यांना भेटत होते. दिवसभराच्या चर्चांतून असा संदेश दिला जात होता की, शरद पवार राजीनामा मागे घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे यांच्यावर केंद्रात जबाबदारी द्यायची आणि अजित पवार यांना राज्यात पूर्ण सत्ता सोपवायची असा निर्णय झाला आहे. मात्र प्रत्यक्षात कोणता निर्णय जाहीर होतो हे शुक्रवारी 5 मे रोजी महाराष्ट्राला कळणार आहे. या दिवशी निवड समितीची अधिकृत बैठक बोलावण्यात आली आहे.
आज शरद पवार सकाळी 10 वाजताच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात येऊन बसले. यानंतर प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आदी नेते येऊ लागले. यामुळे आजच निवड समितीची बैठक आहे असे चित्र निर्माण झाले. मात्र या सर्व काळात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कुठेच दिसत नव्हते. यामुळे जयंत पाटील नाराज आहेत असे वृत्त पसरले. काही काळाने जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे असे वृत्तही झळकले. प्रत्यक्षात जयंत पाटील हे साखर कारखान्याच्या बैठकीसाठी पुण्याला गेले होते आणि संध्याकाळी मुंबईला परतले. मात्र पुण्यात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मुंबईत बैठक असेल तर मला बैठकीची माहिती नाही. त्या बैठकीला मला बोलावण्याची आवश्यकता वाटली नसेल. पवारांशी कालपासून माझी चर्चा झालेली नाही. जयंत पाटील हे नाराज आहेत असे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आणि अखेर मुंबईत प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला की, आज कोणतीही अधिकृत बैठक नव्हती. जयंत पाटील हे कारखान्याच्या बैठकीसाठी पुण्याला गेले होते. जे कोणी नेते मुंबईत होते ते सहजच येथे शरद पवारांना भेटायला आले होते. अध्यक्ष निवडीची अधिकृत बैठक बोलावण्यासाठी मीच निमंत्रक आहे त्यामुळे ही बैठक जेव्हा बोलावण्यात येईल तेव्हा मी सर्वांना माहिती देईन.
दरम्यान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला आलेल्या कार्यकर्त्यांना शरद पवार भेटले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना म्हटले की, अध्यक्ष निवडीची बैठक ही 6 मे रोजी निश्चित झालेली होती. मात्र ती आता 5 मे रोजीच घ्यावी, असे मी सांगितलेले आहे. या बैठकीत जो निर्णय होईल तो मला मान्य असेल. मी जो राजीनामा दिला त्याआधी मी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. मी त्यांना विश्वासात घेतले नाही. ही माझ्याकडून चूक झाली. अध्यक्षपदाच्या निवडीबाबत राज्यात वेगवेगळी चर्चा सुरू असताना छगन भुजबळ म्हणाले की, राज्याचे नेतृत्व अजित पवारांकडे द्यावे आणि केंद्राची जबाबदारी सुप्रिया सुळेंकडे राहावी. छगन भुजबळांचे हे वैयक्तिक मत आहे, असा खुलासा प्रफुल्ल पटेल यांनी केला असला तरी हाच एक मार्ग योग्य आहे, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि प्रतोद अनिल पाटील यांनी मात्र आजही शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, असा आग्रह धरला. अनिल पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा जयंत पाटलांकडे पाठवला. दुसरीकडे अजित पवारांचे समर्थक पिंपरी-चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांनी शरद पवारांच्या निर्णयाचे समर्थन केले. दुसरे समर्थक धनंजय मुंडे यांच्या बीड मतदारसंघात अजित पवारांच्या समर्थनाचे बॅनर लागले होते. आता 5 मे रोजी काय निर्णय होतो याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
वज्रमूठ सभा रद्द! मविआला तडे
शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे मविआला तडे जाऊ लागले आहेत. आज काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उघडपणे संजय राऊत यांना इशारा देत आमच्या पक्षाबद्दल वक्तव्य करण्याचा चोंबडेपणा करू नका, असे म्हटले. यापूर्वी संजय राऊत आणि अजित पवार यांच्यातही खडाजंगी झाली होती. दरम्यान, मविआच्या पुढील सर्व नियोजित वज्रमूठ सभा रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी 14 मे रोजी पुण्यात सभा होणार होती. त्यानंतर कोल्हापूर, नाशिक, अमरावती येथेही सभांची घोषणा झाली होती. मात्र या सर्व सभा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. मविआतील अडचणींमुळे या सभा रद्द झाल्या हे उघड असले तरी सारवासारव करण्यासाठी जयंत पाटील यांनी उन्हाळ्याचे कारण दिले तर नाना पटोले यांनी पावसाळा आला असे म्हटले. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, 1 मेच्या सभेच्या दिवशीच पुढील सभा स्थगित ठेवण्याचे ठरले होते. मात्र 1 मेच्या दिवशी शरद पवार त्यांचा निर्णय जाहीर करणार होते, हे सर्व ज्येष्ठ नेत्यांना माहीत असल्यानेच या सभा रद्द करण्यात आल्या हे उघड आहे.
राष्ट्रवादीची घटना
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार जर पक्षाचा अध्यक्ष बदलायचा असेल तर केंद्रीय निवडणूक समिती आणि राष्ट्रीय कार्यकारिणीत हा निर्णय घेतला जाऊ शकतो. केंद्रीय निवडणूक समिती प्रभारी अध्यक्ष नेमू शकते. अध्यक्षाची अंतिम निवड करण्यासाठी राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्याची गरज नाही.