राहुल गांधींकडून सेबीप्रमुख बुच यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल

नवी दिल्ली – भांडवली बाजार नियामक संस्था सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्यावर काँग्रेसने पुन्हा एकदा हल्लाबोल केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून माधबी बुच यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला आहे.

सेबीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आयसीआयसीआय बँकेतील नोकरी सोडूनही तुम्ही आयसीआयसीआयकडून दरमहा कसले पैसे घेत होता, सेबीसारख्या नियामक संस्थेच्या अध्यक्ष असताना तुम्ही शेअर बाराजात नोंदणीकृत नसलेल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक कशी काय केली, त्या कंपन्यांना स्टार्ट अप इंडिया योजनेतून कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारने कशी काय केली, केंद्र सरकारला तुमची भीती का वाटते की ज्यामुळे सरकार तुमच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे,अशा प्रश्नांची सरबत्ती राहुल गांधी यांनी एक्स पोस्टद्वारे केली.
माधबी बुच अदानींचा पैसा, त्यांच्या कंपन्यांचे बाजारातील मुल्य आणि कंपन्यांची प्रतिष्ठा वाचविण्यासाठी खटाटोप करीत आहेत हे उघड आहे,असा दावा करीत बुच यांना वाचविण्याचा प्रयत्न नेमके कोण करीत आहे,असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. तपास यंत्रणांनी याची चौकशी केली नाही, मीडियाने सत्य शोधण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र सखोल तपास केला आहे आणि वेळ येताच प्रत्यक्ष कारवाईदेखील करू,असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.