बुलडाणा – काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कार्यक्रमात आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत दिशाभूल करून भाजपा आणि त्याचे मित्रपक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात वातावरण तापवत आहेत. आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी तर म्हटले की, आरक्षण संपवण्याची भाषा करणारे राहुल गांधी यांची जीभ छाटणार्याला 11 लाख रुपये इनाम दिले जाईल. गायकवाड यांच्यासारखेच वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे केंद्रिय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनीही करत राहुल गांधींना दहशतवादी म्हटले. राहुल गांधी यांना काहीही करून टार्गेट करण्याची रणनीती शिंदे गट आणि भाजपाने आंखली आहे. यामुळेच गायकवाड व बिट्टू यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
काँग्रेसने आंदोलन केल्यावर रात्री संजय गायकवाड यांच्यावर बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की, राहुल गांधी यांना मागासवर्गीय आदिवासींसह इतरांचे आरक्षण शंभर टक्के संपवायचे आहे. आरक्षण संपवण्याच्या वक्तव्यातून त्यांच्या मनातील ओठावर आले. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. महाराष्ट्रात आणि देशामध्ये आरक्षणाची मागणी जोर घेत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी देशातील आरक्षण संपवण्याचे विधान केले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी फेक नरेटिव्ह सेट करून मते घेतली. आज त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा करीत काँग्रेसचा चेहरा अन् मळमळ बोलून दाखवली. माझे आव्हान आहे की, जो राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस माझ्या वतीने देण्यात येईल.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, संजय गायकवाड यांची सत्तेची मस्ती आणि मस्तवाल भाषा भ्रष्टाचाराच्या पैशातून आली आहे, तिला महाराष्ट्रातील जनता आगामी विधानसभा निवडणुकीत गाडल्याशिवाय राहणार नाही. तो दिवस फार दूर नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे. अशी बेताल विधाने बंद करावीत. आपल्या औकातीत राहावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे त्यांच्यावर काय कारवाई करतात, यावर आमचे लक्ष असेल. सरकारने त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून त्यांना अटक करायला हवी. अन्यथा आम्हाला एकेकाला धडा शिकवावा लागेल.
काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यादेखील या वक्तव्याचा निषेध करत म्हणाल्या की, सत्तेत असलेले लोक, मग ते पंतप्रधान मोदी असोत, गृहमंत्री अमित शहा असोत की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत, फेक नरेटिव्हवाले देवेंद्र फडणवीस असोत, राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करत आहेत. राहुल गांधी यांची जीभ हासडण्याची भाषा कुणी अडाणी करणार असेल तर त्याला माफ करता येणार नाही. पोलिसांनी यावर कारवाई करण्याची गरज आहे. तुम्ही या लोकांना अशी विधाने करू देणार असाल तर महाराष्ट्र आणि देशही माफ करणार नाही. राहुल गांधी यांच्या केसालाही धक्का लागता
कामा नाही. गणपत गायकवाड यांनी असे वक्तव्य केले असतानाच राहुल गांधींवर टीका करताना भाजपा नेते आणि केंद्रिय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांचीही जीभ घसरली. बिट्टू म्हणाले की, देशातले वाँटेड गुन्हेगार किंवा दहशतवादी जशी भाषा करतो तशीच भाषा राहुल गांधींच्या तोंडी आहे. राहुल गांधी एरवीही अशीच वक्तव्ये करतात. जे बॉम्ब हल्ले करतात, शस्त्रधारी दहशतवादी असतात अशा फुटीरतावाद्यांना आणि दहशतवाद्यांना राहुल गांधींचे कौतुक वाटते आहे कारण गांधी त्यांच्याच भाषेत बोलले आहेत. ते एक क्रमांकाचे दहशतवादी आहेत. त्यांच्यावर बक्षीस ठेवले पाहिजे.