कॅलिफोर्निया- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भारतीयांसमोर भाषण करताना पंतप्रधान मोदी आणि भाजपावर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदी हे ब्रह्मदेवाजवळ बसून त्यांनाच विश्वनिर्मितीची माहिती दिली असे राहुल गांधी म्हणाले तेव्हा हंशा पिकला. मात्र भारतात यामुळे भडका उडाला. भाजपा नेते संतापले आणि परदेशात मोदींवर टीका केली म्हणून राहुल गांधींवर बहिष्कार टाका असे आवाहन केले.
पंतप्रधान मोदी यांनी अनेक परदेश दौरे केले. प्रत्येक दौऱ्यात त्यांनी भारतात गेल्या 75 वर्षांत भ्रष्टाचार कसा सुरू होतो, एकच कुटुंब भारताला कसे लुटत होते, हेच आरोप करीत काँग्रेस सरकारच्या काळात भारताची शून्य प्रगती झाली यावरच भाषणात भर दिला. मात्र आता राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिल्यावर त्यांची बहिष्काराची भाषा सुरू झाली असे काँग्रेसने म्हटले.
राहुल गांधी अमेरिकेच्या दहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी कॅलिफोर्नियाच्या सांता क्लारा येथील एका कार्यक्रमात अनिवासी भारतीयांना संबोधित केले. भारत जोडो यात्रेचा अनुभव त्यांनी सुरुवातीला कथन केला. ते म्हणाले, ‘भारत जोडो यात्रा थकवणारी नव्हती, कारण संपूर्ण देश आमच्यासोबत चालत होता. लोक येऊन भेटत होते. मिळून चालत होते. एकमेकांना मदत करत होते. तिथुनच आम्हाला ही संकल्पना सुचली की – तिरस्काराच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडले आहे.’ यानंतर उपस्थितांनी भारत जोडोचे नारे दिले. राहुल गांधी पुढे म्हणाले, ‘काँग्रेस पक्षाला सर्वांबद्दल प्रेम आहे. कोणी आले आणि काही सांगत असेल तर आम्ही ते आनंदाने ऐकतो. आम्हाला राग येत नाही. आम्ही आक्रमक होत नाही. उलट आम्ही प्रेमाने ऐकतो. तो काँग्रेस पक्षाचा स्वभाव आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेत लोक पुढे येऊ लागले. भाजपने यात्रा रोखण्याचे सर्व प्रयत्न केले. पोलिसांचा, बळाचा वापर केला. पण यात्रेचा प्रभाव वाढत गेला. कारण लोकांनी आमची मदत केली.’ ‘देशातल्या प्रत्येक राज्यात संतांची, महापुरुषांची परंपरा आहे. या सर्वांनी हेच सांगितले आहे की, एकमेकांचे ऐका, आदर करा. सर्व धर्मांचा, भाषांचा सन्मान करा. भारताची परंपरा, येथील महापुरुषांच्या शिकवणीने यावरच भर दिला आहे की तुम्हाला सगळे ठाऊक आहे, या प्रभावाखाली राहू नका. जग इतके मोठे आणि क्लिष्ट आहे की, एखाद्या व्यक्तिने आपल्यालाच सर्व माहित आहे हे म्हणणे धाडसाचे ठरावे. भारतातल्या काही लोकांच्या समूहाला असे वाटत आहे की, त्यांनाच सर्व ठाऊक आहे. त्यांना असे वाटते की त्यांना देवापेक्षा जास्त माहिती आहे. ते देवासोबत बसले तर त्यालाही ते समजावून सांगतील की काय चालले आहे आणि अर्थात पंतप्रधान मोदी या लोकांपैकी एक आहेत. मोदीजींना देवाजवळ बसवले तर ते त्यालाही समजावतील की ब्रह्मांड कसे काम करते आणि देवही मोदींचं म्हणणं ऐकून गोंधळून जाईल की, मी नक्की काय निर्माण केले आहे.’
ते पुढे म्हणाले की, ‘आपल्याला सर्वकाही येते, असे समजणाऱ्या लोकांचा एक गट आहे. ते शास्त्रज्ञांना विज्ञान समजावून सांगतील, इतिहासकारांना इतिहास समजावून सांगतील. लष्कराला युद्धनिती समजावतील. पण खरे पाहिले तर अशा लोकांना काहीच येत नाही. तुम्ही कोणाचे काही ऐकून घेण्यास तयार नसाल तर आयुष्यात तुम्हाला काहीच समजू शकणार नाही, हा मोठा धडा मी भारत जोडो यात्रेतून घेतला. प्रत्येकाकडून काहीतरी शिकता येते. तुम्ही समोरच्या माणसाचेही ऐकून घ्यायला हवे. आपल्या देशाकडे कोणतीही संकल्पना आत्मसात करण्याची क्षमता आहे. भारत देश सर्वांचा आदर करतो. आपला देश विनम्र आहे. तो ऐकतो, तो प्रेमळ आहे. या भारताचे तुम्ही प्रतिनिधित्व करता. तुम्ही या मूल्यांची किंमत करता म्हणून इथे आहात. तुमच्यात राग, तिरस्कार असता तर तुम्ही भाजपच्या बैठकीत असता आणि मी मन की बात
करत असतो.’
तुम्ही अमेरिकेत भारताचा झेंडा मिरवता आहात. त्यांना भारतीय म्हणजे काय हे तुम्ही सांगत आहात. त्यांची संस्कृतीही शिकत आहात, त्यांचा आदर करत आहात आणि त्यांनाही तुमच्याकडचे ज्ञान देत आहात. याबद्दल मी तुमचे आभार मानतो, असे म्हणत त्यांनी भाषणाचा समारोप केला. नंतर त्यांनी लोकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. महिला सबलीकरणासाठी सत्तेत आल्यास महिला आरक्षण विधेयक संमत करू असे ते म्हणाले. देशातल्या विविधतेबाबतेतील एका प्रश्नाला उत्तर देताना आपले बळ विविधतेतूनच येते. कोणत्याही भाषेचे अस्तित्व धोक्यात येणे म्हणजे, भारताचे अस्तित्व धोक्यात येण्यासारखे आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राहुल गांधींनी मोदींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, हरियाणाचे मुख्यमंत्री अनिल विज यांनी त्यांच्यावर टीका केली. राहुल प्रत्येक विदेश दौऱ्यात भारताचा अपमान करतात. यावेळीही त्यांनी पंतप्रधान मोदींचा अपमान केला. पण शेवटी तो देशाचा अपमानच होतो, असे अनुराग ठाकूर म्हणाले. विज यांनी आवाहन केले की, प्रत्येक भारतीयाने राहुल गांधीवर बहिष्कार घालायला हवा. भाजप प्रवक्ता अमित मालवीय यांनी ट्विट केले. राहुल गांधी यांनी 1984 च्या शीख नरसंहारावर टीका करत, काँग्रेसने लावलेला तिरस्काराचा वणवा पेटत ठेवला आहे.
खलिस्तान जिंदाबाद आणि भारत जोडो…
राहुल गांधींचे भाषण सुरू असताना तेथे उपस्थित काही खलिस्तानी समर्थकांनी हवेत खलिस्तानी झेंडे फडकावले आणि ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. तेव्हा भारतीय जनसमुदायाने प्रत्युत्तरात नफरत छोडो, भारत जोडो अशा घोषणा दिल्या. यावर राहुल गांधी हसले आणि म्हणाले, ‘नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान’. दरम्यान, अमेरिकास्थित दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींना धमकी देणारा व्हिडिओ जारी केला आहे.
राहुल गांधींची परदेशात मोदींवर सडकून टीका! भाजप संतप्त! राहुल गांधींवर बहिष्काराची मागणी
