नागपूर – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी करीत आहेत त्याबद्दल त्यांनी माफी मागितल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असा गंभीर इशारा आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिला. यामुळे काँग्रेस पक्षात संताप पसरला असून, राहुल गांधी यांची नागपुरात सभा आहे तिथे त्यांना कोण रोखते पाहू, त्यांच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा, असा सज्जड दमच काँग्रेसचे नाना पटोले यांनी दिला.
विरोधी पक्षांची एकजूट करण्याच्या प्रयत्नात राहुल गांधी हे मुंबईला उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी येणार असल्याची चर्चा होती. त्याबाबत बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी हा इशारा दिला. त्यावरून काँग्रेस-भाजप यांच्यातील संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. मात्र एकाही भाजपा नेत्याने बावनकुळे यांच्या इशार्याला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे बावनकुळे एकटे पडल्याचे चित्र निर्माण झाले.
‘राहुल गांधी-उद्धव ठाकरे यांची भेट हा डॅमेज कंट्रोल असेल, तर आम्हाला त्याबद्दल काही बोलायचे नाही. राहुल गांधींनी सावरकरांची अवहेलना केली, त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केलाय. तीच तीच चूक त्यांनी पाच वेळा केली. अनेकांनी राहुल गांधी यांना समजावण्याचाही प्रयत्न केला. तरीही त्यांनी अपमान केला. त्यामुळे महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यांची माफी मागावी, त्यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा,’ असा इशारा बावनकुळेंनी दिला होता. परंतु त्यांच्याच पक्षाने हा इशारा गंभीरपणे घेतलेला नाही.
‘सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली होती, ते माफीवीर आहेत’, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी अनेकदा केले आहे. त्यानंतर हा राजकारणाचा मुख्य मुद्दा करून राहुल यांच्याविरोधात टीका करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. महाराष्ट्रात भाजपतर्फे ‘सावरकर गौरव यात्रा’ही काढण्यात आल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील मतभेदही उघड झाले होते. शिवसेना-उद्धव गटाने राहुल गांधी यांच्या सावरकर यांच्यावरील वक्तव्याचा जाहीर विरोध केला होता. त्यानंतर राहुल गांधी यांची वक्तव्ये थांबली. तरीही बावनकुळे यांना काँग्रेसने प्रतिआव्हान दिले आहे.
‘जनतेला दिलेली खोटी आश्वासने देऊन तुम्ही सत्तेत आलात, ती आधी पूर्ण करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्यांना आतंकवादी म्हणाले, संसदेत रेकॉर्डवर आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या सुरुवातीला आम्ही राहुल गांधी यांना नागपूरमध्ये आणणार आहोत. त्यांना कोण थांबवते ते बघू. तुम्ही त्यांना थांबवून दाखवाच!’ असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.
राहुल गांधींनी माफी मागितल्याशिवाय महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही!!
