मुंबई- राज्य सरकारने घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. रेडीरेकनर दरात यावर्षी कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुन्या (2022-23) रेडीरेकनर दरानेच घर खरेदी करता येणार आहे. यात सरकारने मागील आर्थिक वर्षातील दरात बदल न करता 2023-2024 साठी लागू करण्यात यावा असा आदेश राज्य सरकार ने काढला आहे .
राज्याला 1,143 कोटींचा महसूल मुंबईमध्ये मार्च 2023 मध्ये 12421 मालमत्ता विक्री करण्यात आल्या. त्यातून राज्य सरकारला 1143 कोटींचा निधी मिळाला आहे. यापैकी 84 टक्के निवासी तर 16 टक्के अनिवासी मालमत्ता आहेत. मार्च 2023 मध्ये 1,143 कोटी महसूल संकलनासह, मुंबईने एप्रिल 2022 पासून सर्वाधिक महसूल संकलन नोंद केल्याचे नाईट फ्रँक या अहवालात म्हणतात.
राज्यात कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षे रेडीरेकनर दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, त्यांनतर गेल्या वर्षी रेडीरेकनरच्या दरात जवळपास 5 टक्के वाढ करण्यात आली होती. महानगरपालिका क्षेत्रात 8.80 टक्के, तर ग्रामीण भागात 6.96 टक्के तर नगरपालिका क्षेत्रात 3. 62 टक्के वाढ करण्यात आली होती. मुंबई, ठाणे, पुण्यापेक्षा नाशिकमध्ये रेडीरेकनरचे दरात सर्वाधिक वाढ झाली.