बडोदा – पश्चिम रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक नमुना काल समोर आला असून मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्सप्रेसचा प्रवास पूर्वसूचना न देता अचानक बडोदा स्थानकात संपवण्यात आल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. रेल्वेने या प्रवाशांकडून तिकीटसाठी १७०० रुपये घेतले होते. मात्र परत करतांना केवळ ३०० रुपये परत केल्यामुळेही प्रवाशांचा संताप झाला. त्यामुळे बडोदा स्थानकावर एकच गोंधळ झाला.गुजरातमध्ये सध्या पूरस्थिती आहे. त्यामुळे मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या तेजस एक्सप्रेसचा प्रवास काल बडोदा स्थानकावर संपवण्यात आला. याची कोणतीही पूर्वकल्पना प्रवाशांना देण्यात आली नाही. बडोदा स्थानकाच्या बाहेर पाणी भरले असल्याने प्रवाशांना बाहेरही पडता येईना . त्यामुळे आपली बडोदा ते अहमदाबाद प्रवासाची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशांनी केली. तीही रेल्वेकडून मान्य करण्यात आली नाही. ही रेल्वे बडोद्याच्या आधी भरुच स्थानकावरही एक तासापेक्षा अधिक काळ थांबवून ठेवल्याबद्दल प्रवाशांनी बडोदा रेल्वेस्थानकावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. रेल्वेचे अधिकारी पूराचे कारण देत असतांना मुंबईहून गाडी निघाली तेव्हाच रेल्वेला पूरस्थितीची माहिती नव्हती का अशी संतप्त विचारणा प्रवाशांनी केली. रेल्वेच्या या गोंधळामुळे प्रवासी रात्री ९ वाजल्यापासून पहाटे पर्यंत बडोदा स्थानकात अडकून पडले.