रेल्वेच्या भायखळा प्रिटिंग प्रेसला टाळे देशातील ५ प्रेस बंद करण्याचा निर्णय

मुंबई –

मुंबईतील भायखळा येथील रेल्वेचा छापखाना आता बंद होणार आहे. रेल्वे बोर्डाने देशभरतील पाचही छापखाने बंद करून छपाईची सर्व कामे बाहेरील यंत्रणेद्वारे( आउट सोर्सिंग) करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे येथील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. भायखळा प्रेसमध्ये सद्यस्थितीत २५० ते ३०० कर्मचारी कार्यरत आहेत. छापखाना बंद केल्यानंतर त्यांना इतर विभागांत पाठवले जाणार आहे.

रेल्वेचे देशभरात जाळे पसरले असून दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वने प्रवास करतात. त्यासाठी तिकिटांबरोबरच इतर महत्त्वाचे फॉर्म, मेजरमेंट बुकची छपाई रेल्वेला मोठ्या प्रमाणात करावी लागते. त्यासाठी रेल्वेची देशभरात १४ छापखाने होते. त्यापैकी ९ यापूर्वीच रेल्वेने बंद केले आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात प्रवासी ऑनलाईन तिकिट घेतात. त्यामुळे रेल्वेने मुंबईत भायखळा, दिल्लीत शकुरबस्ती, चेन्नईत रोयापुरम, हावडा आणि सिकंदराबाद, असे पाचही छापखाने बंद करण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने संबंधितांना दिले. त्यामुळे छपाई कामासाठी रेल्वेला खासगी यंत्रणेवर अवलंबून राहावे लागणार आहे. रेल्वेच्या छापखान्यांमध्ये छपाईबरोबरच बायडिंगची कामेही केली जातात. त्यासाठी भायखळा येथे जवळपास ३०० कर्मचारी कार्यरत आहेत. आता छापखाना बंद केल्यानंतर त्यांना इतर विभागांत पाठवले जाणार आहे. याशिवाय प्रेसमधील कर्मचाऱ्यांची भरती आता कायमस्वरूपी बंद होणार असून ते कामगारांच्या दृष्टीने नुकसानकारक आहे.

रेल्वे याआधी ईव्हीएम तिकीट खासगी एजन्सींच्या माध्यमातून छापून घेत होती. त्यामध्ये तब्बल सहा कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. त्यामुळे या तिकिटांची आऊटसोर्सद्वारे होणारी छपाई बंद केली होती. मात्र, रेल्वेने छापखाने बंद करण्याचा निर्णय घेतल्याने ही कामे बाहेरून करून घ्यावीच लागणार आहेत. त्यामुळे छपाईच्या कामात मोठा गैरव्यवहार होण्याची भीती असल्याचे रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर देव यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top