मुंबई – नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असलेल्या मुंबईतील ‘लालबागच्या राजा’चे ९० व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन आज सकाळी ६ वाजता पार पडले. संकष्टी चतुर्थी निमित्ताने चिंचपोकळी येथील मूर्तिकार कांबळी आर्ट्सच्या चित्रशाळेत सकाळी ६ वाजता अगदी मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तिकार कांबळी आर्ट्सचे रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या शुभहस्ते हे पूजन करण्यात आले. यावेळी खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकाचे पूजन केले. हे वर्ष लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ९० वे वर्ष आहे. त्यामुळे यंदाचा उत्सव अत्यंत खास असणार आहे. आजच्या शुभ दिवसापासून वर्गणी गोळा करण्याचे काम जोरात सुरु झाले आहे. दरम्यान, गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा ३ जुलै रोजी संपन्न होणार आहे.