कठुआ –
जम्मू मध्ये रविवारी लोकोपायलट शिवाय एक मालगाडी तब्बल ७० ते ८० किलोमीटर धावल्याची घटना घडली असून ही गाडी शेवटी उची बस्सी या स्थानकाजवळ थांबवल्यानंतर हे थरार नाट्य थांबले व सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
आज सकाळी साडेसात वाजता पठाणकोटच्या दिशेने निघालेली एक मालगाडी जम्मूतील कठूआ स्थानकात थांबली होती. त्यावेळी काही कामानिमित्ताने लोकोपायलट गाडीतून उतरला होता. त्यानंतर काही क्षणातच रोलडाऊनमुळे ही गाडी अचानक पुढे जाऊ लागली. उतारामुळे या गाडीने चांगलाच वेग पकडला होता. ड्रायव्हर शिवाय गाडी चालल्याची माहिती मिळाल्यामुळे संपूर्ण फिरोजपूर विभागात एकच खळबळ माजली. या मालगाडीच्या पाठोपाठ तत्काळ अपघात निवारण गाडीही पाठवण्यात आली. जम्मू तावी लाईनच्या स्थानकांवर आपत्कालीन सायरनही वाजवायला सुरुवात झाली. प्रत्येक स्थानकावर या मालगाडीसाठी ट्रॅक मोकळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अखेर मुकेरियन पंजाबमधील उची बस्सीजवळ ही गाडी थांबवण्यात आली. त्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला. जर ही ट्रेन या काळात थांबली नसती तर पुढे जाऊन भीषण अपघात घडण्याची शक्यता होती. या घटनेचा व्हिडीओही सोशल मिडियावर व्हायरल होत असून निष्काळजीपणाबद्दल रेल्वे प्रशासनाबाबात नाराजी व्यक्त होत आहे.