तिरुवनंतपुरम
केरळमध्ये एका लोको पायलटने ट्रेन १ किलोमीटर रिव्हर्स चालवली. लोको पायलट एका स्थानकावर ट्रेन थांबण्यास विसरला. त्यामुळे तेथील स्थानकावर उतरण्याच्या तयारीत असलेल्यांचा आणि रेल्वे स्थानकावर ट्रेनची वाट पाहणाऱ्यांचा खोळंबा झाला. लोको पायलटला त्याची चूक नंतर लक्षात आली. पण तोपर्यंत रेल्वे स्थानक मागे निघून गेले होते. त्यामुळे लोको पायलटने शक्कल लढवून ट्रेन रिव्हर्स चालवत स्थानकावर आणली.
केरळच्या अलापुजा जिल्ह्यात ही घटना घडली. तिरुवनंतपुरम येथून शोरानूरला जात असलेल्या वायनाड एक्स्प्रेसचा लोको पायलट चेरियनाड रेल्वे स्थानकात ट्रेन थांबवण्यास विसरला. रविवारी सकाळी ७:४५ वाजता ट्रेन चेरियनाड स्थानकात थांबणे अपेक्षित होते. मात्र, ही ट्रेन थांबलीच नाही. चेरियनाड स्थानकापासून १ किलोमीटर पुढे गेल्यावर त्याला आपली चूक लक्षात आली. त्यानंतर त्याने ट्रेन रिव्हर्स घेतली.
चेरियनाड स्थानक मवेलिक्कारा आणि चेंगानूरच्या दरम्यान आहे. कोणत्याही प्रवाशाने याप्रकरणी तक्रार केली नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. ट्रेनला रिव्हर्स घेण्यास ८ मिनिटे लागली. त्यामुळे ट्रेनला उशीर झाला. मात्र, लोको पायलटने पुढच्या प्रवासात हा वेळ भरून काढला. त्यामुळे रेल्वे शेवटच्या स्थानकावर वेळेवर पोहोचली. चेरियनाड स्थानकात कोणताही सिग्नल नाही. इथे स्टेशन मास्तरदेखील नाही. त्यामुळे लोको पायलट या स्थानकात ट्रेन थांबवण्यास विसरला. ट्रेन अशाप्रकारे एखाद्या स्थानकात न थांबवता थेट पुढे नेता येत नाही. त्यामुळे लोको पायलटला याबद्दल विचारले जाईल, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. चेरियनाड स्थानक केवळ हॉल्ट स्टेशन असल्याने ही चूक फार मोठी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.