नवी दिल्ली – वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांची पसंती मिळवत असताना दुसरीकडे या गाडीवर दगडफेकीच्या घटनाही घडल्या आहेत. मागील चार वर्षांत झालेल्या या दगडफेकीच्या घटनांत १५१ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बुधवारी लोकसभेत दिली.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, २०१९ पासून वंदे भारत गाड्यांवर दगडफेकीच्या घटनांमुळे रेल्वेचे ५५.६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणत्याही प्रवाशाचे सामान चोरीला गेल्याची किंवा हरवल्याची घटना घडलेली नाही. प्रवाशांच्या आणि रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेसाठी रेल्वे संरक्षण दल जिल्हा पोलिस आणि प्रशासनासह ‘ऑपरेशन साथी’ राबवत आहे. बिहार,पश्चिम बंगालसह देशातील अनेक भागांत गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आहे.
दरम्यान,’वंदे भारत एक्स्प्रेस’ ही आता पांढऱ्याऐवजी नारंगी आणि राखाडी रंगामध्ये दिसणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या रंगातील वंदे भारतचे फोटो शेअर केले होते. वंदे भारतच्या आधीच्या रंगापेक्षा आताचा रंग अधिक आकर्षक असल्याचे म्हटले जात आहे. देशभरात सध्या २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण ५० वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. या ट्रेनमध्ये पोलिसांची नेमणूक, नियमित दक्षता फेर्या, सीसीटीव्ही कॅमेरे अशा उपाययोजना रेल्वेकडून राबवल्या जात आहेत.