वडाळ्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण होऊनही निष्क्रिय, रुग्णांची गैरसोय

मुंबई – वडाळ्यातील सुपर स्पेशालिटी एमपीटी हॉस्पिटलचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तरीही मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवेपासून वंचित राहाव लागत आहे. काही अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे रुग्ण या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकत नाहीत, त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये जावे लागत असल्याची तक्रार आहे.
एमपीटी हॉस्पिटलमध्ये डायलिसिस मशीन आणि ऑपरेशन थिएटर अशा सोयी आहेत. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) वर रुग्णालय बांधण्यासाठी ऑक्टोबर २०१९ मध्ये निविदा काढण्यात आली होती, परंतु बॉम्बे पोर्ट ट्रस्ट व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालय वापरात येऊ शकत नाही, असे म्हटले जात आहे.आतापर्यंत या प्रकल्पावर १५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. कर्करोगापासून हृदयरोगापर्यंत सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करणारी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. मात्र, पायाभूत सुविधा वापराविना पडून आहेत. त्यामुळे पोर्ट ट्रस्टचे ७५,००० कर्मचारी या सुविधांपासून वंचित आहेत.
२०१९ मध्ये पोर्ट ट्रस्टने आपल्या १५० खाटांच्या या रुग्णालयाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. पीपीपी मॉडेलअंतर्गत अजिंक्य डी. वाय. पाटील समूहाने ऑक्टोबर २०१९ मध्ये निविदा काढली होती. योजनेनुसार त्यानंतर हे हॉस्पिटल ६०० खाटांचे करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन टप्प्यांत काम हाती घेतले जाणार होते. पहिल्या टप्प्यात ३०० खाटांचा समावेश होता. हा पहिला टप्पा डायलिसिस मशीन आणि ऑपरेशन थिएटरसह पूर्ण झाला असूनही रुग्णांची गैरसोय कायम आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top