मुंबई – वरळी कोळीवाड्याला मोठ्या प्रमाणात झोपड्यांचा विळखा बसलेला असून या झोपड्यांमुळे वांद्रे-वरळी सी लिंकवरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना बकाल दृश्य दिसत असते. मात्र आता हे चित्र बदलणार आहे.बया पुलावरून जाताना प्रत्येक व्यक्तीला नेत्रसुखद अनुभव घेता येणार आहे.कारण या कोळीवाड्यातील झोपड्यांच्या भिंती आणि छतांवर रंगरंगोटी करण्यात येणार आहे.तसेच ही झोपडपट्टी आकर्षक विद्युत रोषणाईने लखलखणार आहे.
मुंबई महापालिका या वरळी किल्ल्याचा जिर्णोध्दार व सुशोभिकरण करणार आहे. यामुळे भविष्यात याठिकाणी पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. वरळी किल्ल्याजवळ कोळीवाडा असून जवळून वांद्रे-वरळी सी लिंक मार्ग जातो.पण या मार्गावरून जाणार्या परदेशी पर्यटकांना या बकाल कोळीवाड्याचे दृश्य नजरेस पडत होते. मात्र आता पालिका प्रशासनाने सौंदर्यीकरणाअंतर्गत येथील झोपड्यांच्या भिंतीसह छतांची रंगरंगोटी करण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी पालिकेने कंत्राटदाराची नेमणूक केली असून यासाठी विविध करांसह तब्बल पावणे दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामांसाठी एन.के.शहा इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीची निवड करण्यात आली आहे. पालिका अधिकार्यांनी सांगितले की,पुढील तीन महिन्यांमध्ये या रंगरंगोटीचे काम पूर्ण केले जाणार आहे. वरळी कोळीवाड्यातील घरांच्या भिंती आणि छतांवर एरियल व्हयू केल्याने वांद्रे वरळी सी लिंकवरून प्रवास करताना या परिसराचे विहंगमय दृश्य अनुभवता येणार आहे.
वरळी कोळीवाड्याला नवा साज! रंगरंगोटी आणि सुशोभीकरण होणार
