वर्धा- वर्ध्यातील एमआयडीसी परिसरातील भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधींच्या साहित्यांचे नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच पोलीसांसह स्थानिकांनी तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न केले. याशिवाय अग्निशमन दलाच्या ३ गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनी आग नियंत्रणात आणली.
या गोदामात प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, लाकूड फाट्यांचा मोठा साठा असल्याने आगीने उग्र रुप धारण केले होते. या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र यात मोठी वित्तहानी झाली आहे. ही आग सकाळी ९:४५ च्या सुमारास लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु गोदामातून उंच धुराचे लोट निघाल्याचे दिसल्यानंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहे. याशिवाय पुलगाव येथील सैन्य दलाच्या ताफ्यातून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या. त्यानंतर आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले.
वर्धातील एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग
