वांग-मराठवाडी धरण तुडुंब सर्व चारही दरवाजे उघडले

पाटण – तालुक्यातील ढेबेवाडी खोर्‍यात पावसाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे या भागातील वांग-मराठवाडी धरण तुडुंब भरले असून सांडव्यावरून वाहू लागले आहे. या धरणात पाण्याची आवक १५४१ क्युसेक इतकी झाल्याने धरणाचे सर्व चारही दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये,असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

सध्या या धरणातून प्रति सेकंद २७१ क्युसेक पाणी बाहेर पडत आहे.पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणाची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.या वांग-मराठवाडी मध्यम प्रकल्पात काल ५५.९८८ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ७२ टक्के पाणीसाठा झाला होता.त्याचप्रमाणे या विभागातील काळगावचा साखरी प्रकल्प ओव्हरफ्लो होवून धरणातील पाणी बाहेर पडू लागले आहे.तर दुसरीकडे महिंद्र प्रकल्प गाळाने भरल्याने साठवण क्षमता घटली आहे.त्यामुळे हा प्रकल्प थोड्याशा पावसानेही ओव्हरफ्लो होत असतो.