मुंबई – मुंबईतील वांद्रे परिसरात झोपडपट्टीला आग लागल्याची घटना घडली. सात ते आठ झोपड्यांना आग लागली. ही घटना आज पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या व ६ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. यात २ जण जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वांद्रे येथील नर्गिस दत्त रोड जवळ ही झोपडपट्टी आहे. बुधवारी पहाटे सकाळी ४:३० च्या सुमारास आगीची घटना घडली. सुमारे सात ते आठ झोपड्यांना एकाचवेळी आग लागल्याने मोठा भडका उडाला. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. त्यांनी काही तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पहाटेच्या वेळी अचानक आग लागल्याने वस्तीतील नागरिकांमध्ये घबराट उडाली.