नाशिक : राज्यात पारा सातत्याने वाढत आहे. त्यात खारघर येथे उष्माघातामुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे. कधी नव्हे तो नाशिकमध्येही तापमानाचा पारा ३८ ते ४० अंशापर्यंत पोहोचला आहे. यंदाचा उन्हाळा अधिक कडक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता नाशिकमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्शवभूमीवर महापालिका रुग्णलयांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नाशिक च्या झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये या उष्माघात विभागाची स्थपना करण्यात आली असून, येथे उष्माघाताच्या रुग्णांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. येथे पाच बेड असलेला विशेष सोयी सुविधांसह हा एक राखीव कक्ष आहे. एखादा उष्माघात झालेला रुग्ण दाखल झालाच तर त्याच्यावर ताबडतोब उपचार करण्यात यावे यासाठी आरोग्य विभागाकडून संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची माहिती येथील आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. या विभागात हवा खेळती राहील याची विशेषतः काळजी घेण्यात आली असून, उष्माघात झालेला एखादा रुग्ण दाखल झालाच तर त्वरित त्याच्यावर उपचार करणे गरजेचे असल्यामुळे या विभागात संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचे येथील आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी सांगितले.
वाढत्या तापमानामुळे नाशिकमध्ये रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन
